तीन गझला : गिरीश खोब्रागडे

 




१.


आकाश भेदण्याची ठेवा अता तयारी 

इतरांहुनी असावी अपुली उडाण भारी 


होते लढावयाच्या बेतात आज सावज

फिरला म्हणून बहुधा मागे इथे शिकारी 


केले प्रयास सगळे विसरायचे तुला मी 

येतात पावले पण वळुनी तुझ्याच दारी


आहे मला दिलेली, इतकी कमी मुदत की

फेडू कसा कळेना व्याजासकट उधारी 


सोडावयास शिक्षण भावास भाग पडले 

त्यावर जशी घराची पडली जबाबदारी 

                                                                     

२.


रंगभूमीवर उतरले नट नव्याने 

उलगडू लागेल आता पट नव्याने 


आपला पाडाव करण्याचे जमेना

ते इथे रचतात म्हणुनी कट नव्याने 


जाहलो नाहीच जर आत्ताच सावध 

ओढवू शकते पुढे संकट नव्याने 


पाडुनी पक्षात अपुल्या फूट त्यांनी 

शेकडो निर्माण केले गट नव्याने 


सज्ज आहे लावण्या पळवून त्यांना 

आणखी आले जरी हलकट नव्याने 


३.


निरंतर राहिलो भटकत सुखाच्या सावलीसाठी 

तरी का लागली माझ्या कपाळावर दिसू आठी ?


सतावू लागले आहे पुन्हा हे दुःख कोणाला 

पुन्हा हे कोण एकाकी रडत बसले नदीकाठी 


कुठे लावायला होता तुझ्या पैसा बिमारीला 

तुझ्याकरिता तिला अपुली विकावी लागली गाठी 


कराया वाकडे माझे  कुणाची काय मग हिंमत 

सदा असले जिव्हाळ्याचे तुझ्यासम यार जर पाठी


उगा माझ्या कशाला ती असावी लागली मागे 

इथे कित्येक असताना मुले वेडे तिच्यासाठी 


...................................................

गिरीश खोब्रागडे                          ब्राह्मणवाडा (पूर्व )

No comments:

Post a Comment