तीन गझला : डॉ.चंदू पवार

 




१.

खितपत किती पडावे गरिबीत बापड्याने
भरणार पोट नाही साहेब भाषणाने

इथवर कधीच आल्या नाहीत योजना अन्
दुष्काळ खूप केले जाहीर शासनाने

वाहून स्वप्न गेले डोळ्यांमधील हिरवे
ओटी उगीच भरता फसवून राशनाने

गळफास घेतलेली ती मान आज सुटली
सांगा कसे जगावे उपरान्त त्या घराने

वाढा अजून खिचडी ताटात शिल्लकीची
गुरुजीस हट्ट केला शाळेत लेकराने

२.

मौन गहिवर सांजवेळी
नेत्र धूसर सांजवेळी

दूरदेशी पाखरे अन्
हे सुने घर सांजवेळी

मी रिते केले मनाला
साचते थर सांजवेळी

खोल गेलेला अबोला
हास्य वरवर सांजवेळी

भंगले जग आठवांचे
का तुझी भर सांजवेळी

गूढ निजल्या सावल्या की
जीर्ण थरथर सांजवेळी

रोखल्या मी भावना पण
आत पाझर सांजवेळी

३.

तू हवा होतास माझ्या सोबतीला
ओल नसती राहिली मग पापणीला

आजही वेडावते मन सांजवेळी
रात्र छळते रे अकारण एकटीला

भास होती पावलांचे अंतरी अन्
धावते, कवटाळते मी सावलीला

माळलेल्या मोगऱ्याला गंध नाही
मी तरीही फार जपले बघ कळीला

'वाहवा' तू मिळवली शब्दा,  खरे तर
वेदना ठाऊक लिहिणाऱ्या कवीला


....................................................
डॉ.चंदू पवार
मु.पो.भंडारी ता.पुसद
जि.यवतमाळ ४४५२०४
मो. 8999467312

3 comments: