तीन गझला : पल्लवी उमरे

 



१.

वास्तवाचे भान राखत वागतो जो संयमाने
श्रेष्ठ ठरतो कर्मयोगी चालतो पथ निश्चयाने

कायद्याशी खेळतो ,अधिकार वापरतो  कसाही
लोकशाही म्लान होते दुर्जनांच्या वागण्याने
 
घोषणांना पूर येतो ,योजनाही कागदावर
संभ्रमित जग होत जाते वेळखाऊ कायद्याने

दीनदुबळ्या,वंचितांना देवुया आधार थोडा
माणसांनी माणसांना वागवावे आदराने

घात केला कौरवांनी हारले द्यूतात पांडव
कौरवांवर मात केली युद्ध जिंकत पांडवाने

२.

आजन्म झेलते मी  दु:खास बारमाही 
लेऊन केरकचरा होते नदी प्रवाही

भेगाळली धरा अन् सृष्टी तहानलेली
ग्रीष्मात पोळते अन होते व्यथा तिलाही

उगवेल कूस अवनी दमदार पावसाने
सृष्टीत पावसाचे येणेच अर्थवाही

सुजलाम काननांनी लाभेल प्राणवायू
करतात का कळेना कत्तल अशी कसाई
       
फोडून डोंगराला पाताळ गाठते ती
खळखळ प्रवास करते दमते न ती जराही

कृषकास दान देते होऊन अन्नपूर्णा
उपकार मानवावर करते नदी सदाही

'पापे धुऊन तुमची झाली गढूळ गंगा '
स्वर्गात मोक्ष आता मिळणार ना तुलाही

३.

स्वप्ने उज्ज्वल भवितव्याची, बघून घ्यावे म्हणते
धडपडते मी, पुढचे पाउल चढून घ्यावे म्हणते

वणवण कामे करून झिजला जरी देह हा माझा
लाख संकटे अवतीभवती लढून घ्यावे म्हणते

वळणावरची वाट निसरडी, बघते पुढ्यात धोका
सहज तरीही वाटेवर त्या वळून घ्यावे म्हणते

स्वप्नामध्ये तुला पाहिले , कळी मनाची खुलली
तुझ्यासवे ते जगलेले क्षण स्मरून घ्यावे म्हणते

स्विकारले मी सुखदुःखाला जाणिव झाली तेव्हा
हवे तसे मग मनासारखे जगून घ्यावे म्हणते

जर्जर झाला देह जरासा आप्त सोडुनी गेले
उरले नाही कुणी आपले रडून घ्यावे म्हणते

राखेमधुनी पुन्हा जन्मतो जिद्दी फिनिक्स पक्षी
जगण्यामधले तंत्र जरासे  शिकून घ्यावे म्हणते
  
...................................................
पल्लवी उमरे 'शब्दवैभवी '            ९७६६०७६४२४

No comments:

Post a Comment