तीन गझला : हेमलता पाटील

 



१.


कुणी मेंदी,हळद लावा मला सजवायच्या आधी

भरा भांगात कुंकूही मला जाळायच्या आधी


नको तो हार झेंडूचा नको ती माळ तुळशीची

जुईचा माळ गजरा तू मला मिरवायच्या आधी


तुला येईल बघ माझ्या किळस निष्प्राण देहाची

प्रथम दे शिंपडुन अत्तर मला बिलगायच्या आधी


दिलाचा माहिती आहे किती आहेस कच्चा तू

उरी आणून हिंमत घे मला उचलायच्या आधी


तुला सोडून जाण्याची मलाही हौस का होती?

कितीदा स्फुंदले डोळे तुला सोडायच्या आधी


२.


घुम्यासारखे बसून असते बोलत नाही हल्ली

मन माझे का खुलून काही सांगत नाही हल्ली?


सुकत चालली,पुन्हा पुन्हा ती स्त्रावत नाही हल्ली

जखमेवरची खपली कोणी काढत नाही हल्ली


एकटाच तो बसून असतो सांगत काही नाही

स्पेस द्यायला मीही त्याला छेडत नाही हल्ली


कोऱ्या कविता तशाच पडुनी आहेत किती येथे

रसीक साजण,डोळे माझे वाचत नाही हल्ली


रोज ठरवते आज जरासा वेळ स्वतःला देऊ

काय करू पण काम घरातिल संपत नाही हल्ली


हौस नव्हे तर कामासाठी वणवण फिरते चिमणी

चोचीमध्ये घास पिलांना भरवत नाही हल्ली


जरा मोकळ्या हवेत फिरुनी ताज्या व्हाव्या म्हणुनी

आठवणींना आत मनाच्या टाचत नाही हल्ली


रात्रीची मी गच्चीवरती जात अताशा नाही

चांदण्यातले मला पोळणे सोसत नाही हल्ली


रातकिड्यांची किरकिर भेदत सुनेपणाला नाही

बाजेवरची म्हातारीही खोकत नाही हल्ली


वाट बघत ती पायरीवरी झोपी जाते छकुली

वेळेवरती आईसुद्धा पोचत नाही हल्ली


जितके होते हाती त्याच्या दिले असेलच त्याने

बळजबरीने अजून काही मागत नाही हल्ली


३.


फडफडते पण वात दिव्याची विझली नाही

या श्वासांची हिंमत अजुनी खचली नाही


नाही टाळ्या ना कोणाची दाद मिळाली

समजावे की तुझी शायरी भिडली नाही


कळवेलच तो...येत आज ना भेटायाला

होय पापणी म्हणून तर फडफडली नाही


माझ्यासाठी त्याचे अंबर झुकले नाही

स्पर्शिण्यास ते मीही कंबर कसली नाही


ना कान्हाने सूर छेडले बासरीवरी

राधेचीही बट  वाऱ्यावर उडली नाही


आज जिच्या तो शांत झोपला मांडीवरती

जगला तोवर जमीन त्याला कळली नाही


चेहऱ्यावरचे हसू पाहुनी आनंदी तो

डोळ्यामधली कधी आर्तता दिसली नाही?


दिवस काढले पाणी पिउनी पेज फारतर

घरी भुकेच्या कधीच पंगत उठली नाही


दुनियेमध्ये नसेल इतके दुःख अभागी

ज्याच्यावरती ओळ एकही सुचली नाही


...................................................

No comments:

Post a Comment