तीन गझला : नंदू सावंत

  



१.


घातले नात्यास कुंपण हे बरे झाले

सोडले शापीत जीवन हे बरे झाले


काय देण्यासारखे होते तुझ्यापाशी

ठेवले श्वासास तारण हे बरे झाले


राहिली नात्यात केवळ औपचारिकता

वेगळे झालोत आपण हे बरे झाले


थांबुया थोडे नको भेटायला आता

गवसले जगण्यास कारण हे बरे झाले


घर तुला शोधायला मग त्रास होतो ना

बांधले दारास तोरण हे बरे झाले


कोणता अद्याप धागा राहिला होता..?

मोकळे केलेस बंधन हे बरे झाले


पाहिला निपचीत जेव्हा देह सरणावर

थांबली सारीच वणवण हे बरे झाले


२.


अढळपद सत्यवचनाने मिळवलेला बारमाही

दिसे रात्रीस ध्रुवतारा उगवलेला बारमाही


ऋतूंची कालमर्यादा मला काही मान्य नाही

तुझा माझा ऋतू आहे बहरलेला बारमाही


गलबताला फसवणे एवढी सोपी गोष्ट नाही

शिडाला मार्ग कळतो ना बदललेला बारमाही


कुणी जर शिंपले पाणी कसोशीने भावनांचे

मनाचा वृक्ष ही असतो डवरलेला बारमाही


तुझी वारी पुन्हा होईल की नाही कोण जाणे

तुझ्यातच पांडुरंगा मी मिसळलेला बारमाही


३.


सरतेशेवट तुझे लागते गाव ईश्वरा

संपत जाते आयुष्याची हाव ईश्वरा


जेव्हा कवडीमोल जिंदगी वाटत जाते

आधाराला तुझेच येते नाव ईश्वरा


एक दिवा श्रद्धेचा नियमित लावेनच मी

एक दिवा तू तुझ्या कृपेचा लाव ईश्वरा


करेन हासत श्वास तुला प्रत्येक समर्पित 

एकदाच घे या हृदयाचा ठाव ईश्वरा


जोड तुझी जर असेल माझ्या कष्टांना तर

उलटवीन मी हरलेलाही डाव ईश्वरा


जिथे जिथे मज गरज भासते उभा ठाकतो

म्हणून माझे नसते म्हणणे पाव ईश्वरा


...................................................

No comments:

Post a Comment