तीन गझला : रमेश सरकाटे

 





१.


जिथे इज्जत असे तेथे खुशीने जात असतो मी 

निळा झेंडा उभाराया पुरा जोशात असतो मी 


म्हणालो चोर चोरांना जयांनी लूटले आम्हा 

कुठे चुकले मला सांगा जरी रागात असतो मी


फसे चक्रात आताशी विरोधी बोलणारा,पण

भिणारा मी नसे त्यांना जरी लाखात असतो मी 


सदा जयभीम बोलाया मला अभिमान भीमाचा 

असे अवलाद भीमाची किती गर्वात 

असतो मी 


मला ना स्वार्थ पैशाचा मला ना हाव सत्तेची

निळाईच्या भल्यासाठी निळ्या गोटात असतो मी 


उन्हाळे पावसाळे पण  किती मी सोसल्यावरही

हमेशा गीत भीमाचे मनाशी गात असतो मी 


किती आधार आम्हाला जगाया संविधानाचा 

अताशी झोपडीमध्ये किती थाटात असतो मी


२.


चिंता लाखो असता ,कोणी आसू लुटले 

डोळ्यात आसवांचे, तलाव मोठे फुटले


संकेत लाल मिळता ,व्यवहार सर्व थांबे

दिसता तुझा इशारा, सारेच प्रश्न सुटले 


कितीक सांगू ऐकत माझे कुणीच नव्हते

वात्रट होतो ,ज्याने त्याने यथेच्छ कुटले


संविधान जर समान,अधिकार देत आहे 

जातीमुळेच नाते  माणुसकीचे  खुटले 


नकारात तुझ्या जरी आनाकाणी असते

नाव माझे आता तुझ्या नावाशी जुटले


लहान असता फिर्याद दिली कोर्टामध्ये 

आजोबा मी झालो, लंबित तरी खटले


३.


द्वंद्व होता आत माझ्या रोजच्याला मीच हरलो 

धोरणी मारेकरी माझाच येथे मीच ठरलो 


बोलले ते, आज ह्याला जाळला पण हा जळेना

दुःख सोडेना मला दोस्तीत खासा मीच उरलो


वेळ असते भेटण्याची,वाट पाहत रोज असतो 

गावचा वारा तिच्या, सोसत मनाने मीच झुरलो


तोडुनीया जन्मगाठी सजविले घर अजनब्याचे

सासरी जाताच ती मग आखरीला मीच सरलो


अंधश्रद्धा पाळल्याने  आसवांना पीत गेलो 

धम्म अंगीकारल्याने जिंदगीला मीच तरलो


...................................................

No comments:

Post a Comment