१.
कोण जाणे शेवटाला काय आहे ?
ज्ञात नाही जर उद्याला काय आहे ?
ते तुझ्यापुरते असू दे फक्त सारे
सांगतो मजला कशाला काय आहे?
काय आहे वाढले कोणास ठाउक?
पांघराया अन् उशाला काय आहे?
भांडला तो आजही त्वेषात का रे?
आकळेना की पणाला काय आहे?
पीक-पाणी भाव जर का ठीक आहे
तर विचारा या सणाला काय आहे ?
जाणणे आहे स्वभावा, तर कळावे
त्या तयाच्या वाचनाला काय आहे?
जाळणे ते चांगले नाही मनाला
व्यर्थच्या त्या जाळण्याला काय आहे?
२.
दांडगा अनुभव असावा सोसण्याचा
वा असावा शौक दुःखा जोखण्याचा
वाकणेही तू शिकावे रे प्रसंगी
सोस नाही चांगला तो मोडण्याचा
तूच जे आरोप केले मजवरी तर
सोडला मीही इरादा खोडण्याचा
लागले तुजला जरी मी बोललो जे
तो नव्हता यत्न तुजला टोचण्याचा
मायबापाने तुला जर पोसले तर
त्रास का व्हावा तयांना पोसण्याचा?
सख्य नाही फारसे माझे तिच्याशी
व्यर्थ का मग घाट नाते जोडण्याचा?
गुपित मित्राने कधी जे चर्चिले ते,
चांगले का ते कुठेही ओकण्याचा?
३.
आला असा जमाना खोट्यास नाव आहे
मागे परी खऱ्याच्या भलताच काव आहे
प्रगती कशी म्हणावी येथे अशा विकासा,
मेरीट ते शहर अन् नापास गाव आहे
मुक्ती मिळेल केव्हा त्याच्या व्यथेस सांगा
जे पिकवले श्रमाने,ना त्यास भाव आहे.
आगार वेदनेचे आहे जरी हृदय ते,
सांगू नये असा तो नाजूक घाव आहे.
कबरीत पाय असती दोन्ही जरी तयाचे
का मोह जात नाही?का अजुन हाव आहे?
केल्या किती विनवण्या,ती आमिषे दिलेली
बधणार ना असा तो हट्टी स्वभाव आहे
उलटे अता मिळाले परिमाण या जगाला
मंदीत तो हिरा अन् काचेस भाव आहे.
पेटून जो उठावा,दिसलाच ना जराही
वाचाळ तो विरांचा पोकळ जमाव आहे
अनिल जी आपल्या तीनही गझला सुंदर आहेत. मनाला भावतात.
ReplyDeleteमनापासून आभार🙏
Deleteखूप छान
ReplyDeleteधन्यवाद सर,🙏
ReplyDelete