तीन गझला : निलोफर फणीबंद शेख

 



१.


कोणते नाते तसे दोघात आहे 

चालले सगळेच जर मौनात आहे 


'ती कधी नाही करत काही, कुठेही' 

जाणिवांवर केवढा आघात आहे 


ती समंजस, संयमी कायम असावी 

'बाहुली' हा शब्द पण कंसात आहे


यामुळे दिसते मला लेकीत आई 

केवढी माया तिच्या डोळ्यात आहे


थांब आयुष्या,हळू दे रे झुला तू 

हे हृदय माझे तुझ्या झोक्यात आहे


घेतली कुठलीच ना शिकवण कधीही 

फक्त पुतळा मांडतो चौकात आहे


पाचशे रुपयात विकतो तो स्वतःला

लोकशाही यामुळे धोक्यात आहे


२.


मला नजरेत पाहुन माणसांना वाचता येते 

नजर वाचून सुद्धा संयमाने वागता येते 


कुणी वाट्टेल ते नाही लिहू शकणार माझ्यावर 

मला 'आयुष्य' नावाची वही सांभाळता येते 


ग्रहांना जोडतो आहे जरी माणूस तंत्राने 

कुठे पण माणसांना माणसांशी जोडता येते?


जरी अनमोल असल्या भावना पण श्रेष्ठ तो ठरतो 

बघुन कर्तव्य ज्याला भावनांना जाळता येते


नदी पाहून दिसते साम्यता इतकी मला कायम 

तिलाही वाहता येते, मलाही वाहता येते


पतंगासारखे उडणे तुला तर भावते कायम

तुझ्या हृदयास मांज्याने मलाही बांधता येते


किती शिकले सवरलेही तरी आहे अडाणी मी 

अगं आई, तुझी माया मला का मोजता येते?


३.


एक चिंता पसरली देशात माझ्या

हुकुमशाही वाढली देशात माझ्या


धर्म आहे बस नशा, चढलीच जर का

द्वेष आणिक दंगली देशात माझ्या


धर्म,जाती,प्रांत,भाषा एक व्हावे

भावना ही हरवली देशात माझ्या


सूर्य समतेचा कसा उगवेल सांगा

विषमतेची सावली देशात माझ्या


एकतेची भाकरी होणार कोठे?

चूल भलती मांडली देशात माझ्या


भीम, शाहू अन् फुले होतिल पुन्हाही 

ती निती जर पेरली देशात माझ्या

....................................................

2 comments: