तीन गझला : भरत शिंदे

 




१.


वादळांशी भांडणाऱ्या  छप्पराचे काय झाले?

माय गेली, बाप गेला, लेकराचे काय झाले?


कोरडे नक्षत्र गेले, पूर आला पापणीला 

कालच्या त्या रूजलेल्या अंकुराचे काय झाले?


मीच केला स्वर्गवासी आज आत्मा अंतरीचा

फोडलेल्या घागरीच्या खापराचे काय झाले?


मानवा झालास स्वार्थी छाटली तू कैक झाडे

त्या निवारा मोडलेल्या पाखराचे काय झाले?


झोपलेला चंद्र लुटला काल रात्री माणसा तू

आसवांना ढाळणाऱ्या अंबराचे काय झाले?


२.


मागतो मी न्याय केवळ,गैर काही मागतो का?

हक्क माझे मागतो तर आज बोजा वाढतो का?


जाहिरातीवर उगाचच खर्च करतो रोज लाखो

अंथरुण पाहून अपुले पाय केव्हा पसरतो का?


सारखी लुटते तिजोरी भाबड्या जनमाणसाची

चतुर चौकीदार अपुला रोज दिवसा झोपतो का ?


जीवनाच्या शेवटीही व्याजसुद्धा फिटत नाही

फेडण्यातच शेत गेले देह तारण ठेवतो का?


लोकशाही चालली ही दडपशाहीच्या दिशेने

संविधानाला बघूया देश माझा तारतो का?


३.


खर्‍याला फुलांचा कधी हार नाही 

घराला सुखाचे सदा दार नाही


कळस मंदिराला इथे सोनियाचा

अडगळीत शाळा,तिला दार नाही


असे घोषणांचा,सदा पावसाळा

विकासास येथे,जरा धार नाही


नको धर्म आता,नसावी विषमता

गनिम आत आहे,सिमापार नाही


प्रियेचा दुरावा करी नयन ओले

गुलाबी हिवाळा जरा गार नाही           

....................................................

भरत शिंदे ,

(पारनेर, अहिल्यानगर),

जि.प.शिक्षक सांगली

ह.मु. तासगाव जि.सांगली


No comments:

Post a Comment