१.
ऐकून तू कुणाचे चढलास बोहल्यावर?
का दु:ख मानतो रे संसार मोडल्यावर?
तोडून सर्व नाती आता रहा सुखाने
ती स्पष्ट गाठ दिसते तुटक्यास जोडल्यावर
आता कुठे जरासा तू झोपतो सुखाने
एकूण एक नाती विश्वात तोडल्यावर
रात्रीस झोप नाही, ना चैन या जिवाला
हुरहूर वाढलेली काळीज चोरल्यावर
नाते असे सुखाचे बांधावया निघालो
कळली जबाबदारी असतेय थोरल्यावर
२.
तुझे तूच आता बघू लागला का?
मनासारखे तू जगू लागला का?
कुरूक्षेत्र झाले हरेकास जगणे
तुझ्या आत अर्जुन घडू लागला का?
नशा कोणती चांगली सांग आहे?
नशेच्या विरोधी लढू लागला का?
किती हर्ष दिसतोय सृष्टीत सार्या
मनी खोल चैतन्य भरू लागला का?
असू दे समोरी जरी आपलेही
अता एकटा तू लढू लागला का?
३.
संविधानामुळे घेतली मी भरारी
तोडले आज मी बंधनांना विखारी
लागलो मी बरे आणि वाईट समजू
पुस्तके वाचली आणि आली हुशारी
पाचवीला लढाई अशी आमच्या ही
जिंकण्याची मनी तूच भरली खुमारी
चल धरू लेखणी आज मजबूत हाती
तीच तलवार होईल कणखर दुधारी
ना कधी संपलेला कधी यार संघर्ष येथे
रोज लढण्या असावी नेहमीची तयारी
..................................................
सुंदर
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete