तीन गझला : सुरेश शेंडे




१.


ती तिच्या धारदार डोळ्यांनी

रोज करते शिकार डोळ्यांनी


त्यास दिसणार काय श्रीमंती ?

पाहतो जर भिकार डोळ्यांनी


काय डोळ्यांस पाहिजे आहे?

एकदा तर विचार डोळ्यांनी


दुःख माझी  तपासणी करते

फार तपशीलवार डोळ्यांनी


मी जणू तावदान काचेचे

बघ मला आरपार डोळ्यांनी


काय आहे मनामधे  माझ्या..?

वाचते 'ती' हुशार डोळ्यांनी


मी उचलताच उचलतो आहे

आसवांचाच भार डोळ्यांनी


रोज डोळ्यांत ओततो 'दृष्टी'

आंधळा चित्रकार डोळ्यांनी


ती विझवते क्षणात क्रोधाला

पाहुनी निर्विकार डोळ्यांनी


पाहिले आजवर किती रस्ते

अन् किती चढउतार डोळ्यांनी!


२.


पंख फुटल्याबरोबर उडू लागला

एक पक्षी, नभाशी भिडू लागला


चंद्र पाहुन भिकारी रडू लागला

'भाकरी, भाकरी' ओरडू लागला


पिंजऱ्यातील पोपट बघत राहिलो

देह माझा किती फडफडू लागला


तीच आली असावी अचानक इथे

त्यामुळे श्वासही धडधडू लागला


खेळण्याला कसे मी म्हणू खेळणी?

जीव जर खेळण्यावर जडू लागला


घोर चिंता सतावत असावी तुला

त्यामुळे तू असा बडबडू लागला


३.


काळजावर तुझे नाव कोरायची

एक संधी मला दे 'तुझा ' व्हायची


ठेवलेले जहर दूर फेकायची

माय डोळ्यांपुढे लेक आणायची


माणसांवर सतत माणसे घासतो

त्यास आहे सवय आग लावायची


पायथ्याशी उगा का उभा राहिलो?

मान होती तुझी फक्त झुकवायची


कोरडे पात्र आहे मनाचे तुझ्या

लाट माझी तुझ्याशी न भेटायची


पाखरांनो, तुम्ही या परत एकदा

हाक चिमणी अशी रोज मारायची


मी पतंगाप्रमाणे फिरत जायचा

'ती' दिवा होउनी श्वास जाळायची


जीव लावू नका एवढा यार हो

वेळ झालीय 'माझी' अता जायची


...................................................

सुरेश शेंडे,

गडचिरोली

1 comment: