तीन गझला : जीवन धेंडे

 




१.


फार उलट्या काळजाची भेटली

माणसे खुरट्या मनाची भेटली 


त्या किनाऱ्यावर मला सोडायला

एक होडी कागदाची भेटली


मी कुठे नाही कधीही बोललो

की मला उंची नभाची भेटली


कोण होते एवढ्यामध्ये इथे

ही मला जागा कुणाची भेटली?


तू कसा जाशील वाया सांग ना

संगती जर चांगल्याची भेटली


२.


ती जराशी बोलल्यावर जीव जातो

छान पैकी हासल्यावर जीव जातो


ते तिचे जवळून जाणे जीवघेणे

त्यात वळुनी पाहिल्यावर जीव जातो


जीव माझा गुंतला केसांत ओल्या

केस ओले झटकल्यावर जीव जातो


एक तर डोळे तिचे काळे करारी

त्यात काजळ घातल्यावर जीव जातो


केवढे नाजूक आहे काय सांगू

फूल माझे लाजल्यावर जीव जातो


फार म्हणजे फार ती घाईत निघते

त्यात क्षणभर थांबल्यावर जीव जातो


एकदाचा खून कर ह्या 'जीवना'चा,

सारखे तू टाळल्यावर जीव जातो


३.


फक्त खुर्चीला खुणावत राहिली

राज्य गेले ; बादशाहत राहिली


तो दिवा विझणार आहे शेवटी

एक आजी तेल घालत राहिली


दु:ख माझे चालते आहे पुढे

मात्र इच्छा पाय खोडत राहिली


काय द्यावे जीवनाला दान मी,

आसवे केवळ अनामत राहिली


चार दाणे भेटल्याने पाखरे

कैकदा जाळ्यात अडकत राहिली


काढल्याने सारख्या खपल्या जुन्या

ती जखम आजन्म चिघळत राहिली


घातला नाही कुणी टाका कसा?

माणसे काळीज उसवत राहिली


.................................................

जीवन धेंडे,

बार्शी,सोलापूर

No comments:

Post a Comment