तीन गझला : नितीन गजानन सुर्वे

 




१.


आसवांना पापण्यांशी थांबवावे लागते.

ठीक आहे,ठीक होते हे कळावे लागते


दुःख माझ्या जीवनाचे पाहतो लाटांपरी.

भेटण्याआधी किनारा, ओसरावे लागते.


जात होतो मी पुढे पण पाय मागे ओढले

कोण होते ओढणारे ओळखावे लागते.


रंग त्यांनी चेहऱ्यांना लावलेले पाहुनी

कोण परके, कोण माझे लक्ष द्यावे लागते.


भेटही होते तयाची, पूर्ण होते कामना

मुक्त आहे दार त्याचे फक्त जावे लागते


दंगलींचे बेत त्यांचे रोखण्याला यार हो

माणसांना माणसासम वागवावे लागते


ऐकण्यासाठी कुणाच्या अंतरीचा हुंदका

अंतरी तू वेदनेला साठवावे लागते


२.


इतुकेच भाग्य देवा दानात मागतो मी

गुणधर्म वैष्णवांचे देहात मागतो मी


शोधून सापडेना देशात लोकशाही

सन्मान वंचितांचा न्यायात मागतो मी


प्रेमात चालणारा संसार हा सुखाचा

तडजोड जीवनाची दोघात मागतो मी


आभाळ फाटलेले उध्वस्त रान झाले

सन्मान मग बळीचा भावात मागतो मी


कित्येक संकटांनी आयुष्य त्रासलेले

आनंद जिंदगीचा त्रासात मागतो मी


पाऊस घोषणांचा दुष्काळ योजनांचा 

सरकार सत्यवादी राज्यात मागतो मी


मुर्दाड माणसांच्या आहेत मैफिली ह्या

का दाद शायरीला

 'क्या बात' मागतो मी?


३.


आनंद सावलीचा बघ गारव्यात नाही

होईल शांततेने,ते भांडणात नाही


सांगायचे कसे ते कौतूक 'मी ' पणाचे

स्वप्नात रोज राजा पण वास्तवात नाही


गर्दीत कौतुकाच्या हरवून आज गेलो

एका क्षणात असते, दुसऱ्या क्षणात नाही


मंजूळ बोलण्याचे कौतूक फार होते.

पण मुक्त वागण्याचे सुख पिंजऱ्यात नाही


माझी जुनी कहाणी मी सांगतो नव्याने

दुःखात सोसण्याची गोडी सुखात नाही


शोधून सापडेना गोकूळ आज कोठे

गोतावळा स्वतःचा हल्ली घरात नाही.


....................................................

नितीन गजानन सुर्वे,

रायगड 

No comments:

Post a Comment