१.
जगतो इथे असा की जगणे असह्य होते
मरतो इथे असा की मरणे असह्य होते.
जिंकायचे जगाला,हे स्वप्न पाहतो पण
हरतो इथे असा की हरणे असह्य होते
निवडायचे कुणाला हा प्रश्न भेडसावे
फसतो इथे असा की फसणे असह्य होते.
विरहात मी प्रियेच्या नसतो कधी परंतू
झुरतो इथे असा की झुरणे असह्य होते.
छाटून पंख माझे उड्डाण तोडल्यावर,
उरतो इथे असा की उरणे असह्य होते.
२.
चष्मा तुम्ही बदलला ; पुसता मला कसा मी
होतो जसा अगोदर, अद्यापही तसा मी
सोडून साथ गेले माझे सवंगडी पण
रडलो कधीच नाही त्यावर ढसाढसा मी
गझलेत राव नाही पण रंकही कुठे मी
उमटून ठेवला बघ माझा इथे ठसा मी
येतात मैफलीला ते मद्यपी रसिक पण
ही नम्रताच माझी म्हणतो तयां 'बसा' मी
जे दावती जगाला श्रेष्ठत्व फालतूचे
जाणून पूर्ण आहो त्यांच्या नसा नसा मी
हेवा कशास मजला उत्तम गझल-कवींचा
सेवा करावयाचा बघ घेतला वसा मी
द्वेषात शक्य नाही होणे विकास अपुला
हे सांगतो जगाला फोडून हा घसा मी
झालो सतर्क आता चाखुन पराभवाला
स्पर्धेत झोपणारा नाही अता ससा मी
लडिवाळ बाळ मी हो खांद्यावरी गझलच्या
प्रेमात वाढलेला,श्रीमंत मी असामी
३.
भावनांचा ओघ कायम, पावसाचा जोर कायम;
आत माझ्याही मनाच्या नाचणारा मोर कायम
मानले की लोक सारे सभ्य अथवा साव येथे
एक असतो माणसाच्या आत दडला चोर कायम
नित्य पोशिंदा जगाचा संकटांनी वेढलेला
का गळ्याशी रे तयाच्या लागलेला दोर कायम
हा पिसारा मोरपंखी लेवुनी मी नाचतो पण
राहते दु:खात माझ्या या मनी लांडोर कायम.
सौख्य येते या घराला आटते मम रक्त जेव्हा
राबते आहे जिवाला जुंपलेले ढोर कायम
काय ते होणार आहे या जगाचे कोण जाणे?
लागलेला मात्र आहे ह्या जिवाला घोर कायम
मी जरी सौभाग्य आहे, तूच माझी भाग्यरेखा;
या तुझ्या भाळावरीही चांदव्याची कोर कायम
...................................................
अनिल जाधव,
अमरावती,
९४२२८ ५७०६०
अप्रतिम 👌
ReplyDeleteचष्मा तुम्ही बदलला,
ReplyDeleteगझलेत राव नाही,
हेवा कशास मजला,
अतिशय सुंदर, व्वा !