१.
तिच्या शहरात आलो मी; तिला भेटून येऊ का?
तिचा नंबर अजुनही पाठ आहे, फोन लावू का?
निनावी पत्र अन् मिसकॉलचा गेला जमाना तो...
मला जे वाटते आहे तिला मी थेट सांगू का?
"तिचे हसणे, तिचा डीपी, तिचे स्टेटस - खरे नसते"
असा खोटा दिलासा मी मला देऊन पाहू का?
इमोजी, टेक्स्टमध्ये नेमके नाही कळत काही
तिला इनबॉक्समध्ये आसवे धाडून देऊ का?
विषय आला नकोसा बोलताना शेवटी जेव्हा
म्हणाली, "खूप झाला वेळ, चल मी फोन ठेवू का?"
२.
जरी आपली वाट वेगळी करतो आपण
तरी पुन्हा सारखाच रस्ता धरतो आपण
लाट उसळते परिस्थितीची एकाएकी
कसेबसे मग प्राणपणाने तरतो आपण
दिवस आजचा अपुल्यासाठी खोटे नाणे
रोज रुपेरी आठवणींना स्मरतो आपण
साथ द्यावया कुणीच नसते असून सगळे
कधी कधी मग असे एकटे उरतो आपण
कळावयाच्या आत संपते सगळे काही
सरणावरती संथ गतीने सरतो आपण
३.
मनासारखे जगून घेऊ
जे होइल ते बघून घेऊ
चार-दोन दिवसांचे आहे
वसूल जगणे करून घेऊ
प्रश्न सोडवू नंतर सगळे
आधी जेवण करून घेऊ.
दिवस उद्याचा असेल अपुला
एकेकाला बघून घेऊ
दिले ढगांनी पाणी थोडे
डोळे ओले करून घेऊ
रडून आहे काय फायदा?
विसरुन सगळे हसून घेऊ
...................................................
अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४
No comments:
Post a Comment