गझल : रमेश मंमाळे

 




नाते तुझे नि माझे आहे जुने-पुराणे
तू मेघ पावसाचे, मी चातकाप्रमाणे

अंदाज लावता ना आला मला हवेचा
गेली निघून वर्षा वाऱ्यासवे दग्याने

आता नभात त्यांनी केली जरी ठिकाणे
खोडात पाखरांचे आहे जुने घराणे

बोलावतो कुठे रे मी आत आठवांना
येती फिरून माझ्या शेतामधे थव्याने

जाते कशी रिकामी ती याद रे पुरानी
झोळी भरून नेते डोळ्यांतले खजाने

विश्वासघातकी ती सांगा कसे म्हणू मी
स्वप्नात रोज माझ्या ती भेटते छुप्याने

वाटा जरी गुलाबी, चाला जपून दाजी
होईल घात तुमचा वाटेतल्या खड्याने

माझ्यापुढे उन्हाची औकात काय आहे
लोखंड जाळतो मी माझ्याच कोळशाने

बागेतल्या किड्यांनो छेडू नका फुलांना
रेषा कशी समांतर भेटेल ताणल्याने

.................................
रमेश शंकरराव मंमाळे,
मु.पो. चिंचोली जहागीर ता.उमरगा
मो. 9921018996

3 comments:

  1. खूपच छान व उत्कृष्ट गझल.

    ReplyDelete
  2. खूपच छान अप्रतिम वर्णन केलेला आहे

    ReplyDelete
  3. झाली सुरेख रचना
    शब्द शब्द फुलला
    किती किती म्हणोनी
    दाद द्यावी या गझलेला...🌹🌹🌹🌹🌹👍

    ReplyDelete