तीन गझला : माधुरी खांडेकर

 




१.


विनासायास मिळते का सुखाची झोप कोणाला 

करावे लागले होते दिवसभर कष्ट देहाला 


हवी आहे जशी मूर्ती  घडव आकार मातीचा 

कुणी देईल का सांगा कधी आकार पाण्याला


कधी मैदान गाजवते, कधी चित्रातही रमते 

करत अभ्यास मी नाही अशी का खंत बापाला


मनाच्या पिंजऱ्यामध्ये तुला मी कोंडले होते 

कसा तोडून तू गेलास या नाजूक हृदयाला 


उद्याचे स्वप्न पाहू की उद्याची काळजी वाहू?

ठरेपर्यंत हे अजुनी रजा घे सांग सूर्याला 


२.


आंधळा राजा कुठे लाचार होता 

पुत्रप्रेमाचा जुना आजार होता 


खोल गेलेले तिचे डोळे बघितले 

गोड खारट आसवांचा भार होता 


गाल का झाले तुझे इतके गुलाबी 

मी दिलेल्या मोगऱ्याचा वार होता 


माळ आकाशात बगळ्यांची निघाली 

की नभाला घातलेला हार होता 


आवलीला विठ्ठलाचा राग होता 

अन् तुक्याचा तोच तर आधार होता  


३.


नदीकिनारी वाळूवरती नाव तुझे मी कोरले 

तुझ्याप्रमाणे पाण्यानेही पुसून अलगद टाकले 


जगावेगळी वाट निवडली एकटीच मग चालले 

लोकांनी तर चेष्टा केली मला एकटे पाडले 


नकोत भिंती,दारे,खिडक्या नको कोणत्या चौकटी 

आभाळाच्या पंखाखाली श्वास मोकळे घेतले 


कर्तृत्वाच्या जोरावरती तिने उंबरा लांघला 

घरातल्याही कर्तव्याचे ओझे नाही मानले 


जात कोणती? धर्म कोणता? उत्तर द्या हो म्हणाले 

कष्टकऱ्यांची जात आमची,  लगेच मीही बोलले 


No comments:

Post a Comment