तीन गझला : बाळू घेवारे

 



१.

माझी वारी झाली कोठे खरी विठ्ठला
डोळ्यांपुढती दिसली बजबजपुरी विठ्ठला

संतचरणरज जरी लावले भाळाला मी
वासनांचीच भुते नाचली उरी विठ्ठला

कीर्तनात तू नाचत होता दंग होउनी
तळपत होती हाती माझ्या सुरी विठ्ठला

हौसे,गवसे,नवसे आणिक नवखे होते
प्रत्येकाची अलगच रे सुरसुरी विठ्ठला

भुके-कंगाल होते माझ्या सभोवताली
होतो मजेत मी खात शिरापुरी विठ्ठला

घोड्यामागे धावत होत्या किती कल्पना
हातावरती वाटत होतो तुरी विठ्ठला

एक भाबडी इच्छा माझी पुरी करावी
व्हावी अवघ्या देहाची पंढरी विठ्ठला

नकोस देऊ अंतर मजला सख्या श्रीहरी
वास असावा तुझा हृदय-मंदिरी विठ्ठला

२.

किती वागतो खोटे आपण
इंद्रायणीचे गोटे आपण

उगा मारतो फुका बढाया
फारच असतो छोटे आपण

उंच गाठले आभाळाला
विचार करता थोटे आपण

असतो का हो स्थिर कधीतरी
बुड नसलेले लोटे आपण

कशी विणावी नात्यांची विण
बिनकामाचे धोटे आपण

...............

* उच्चारी वजनाप्रमाणे 'चे ' ह्या शेवटच्या अक्षराची मात्रा घटवून लघु केली आहे.

३.

तुझा शब्द माझ्या उरी घाव देतो
कळेना मला मी कुणा भाव देतो

खरा सोयरा सोय जाणे मुक्याने
भुकेल्या घरी पाहुणा ताव देतो

गुणी बाळ ज्याही घरी जन्म घेतो
घराला जगी तो पुन्हा नाव देतो

जरी सोबतीने उभा जन्म जातो
कुठे एकमेका खरा ठाव देतो

कशाला कुणाची करू काळजी मी
विठू,अंतरी ह्या तुला ठाव देतो

जशाला तसा तू इथे वाग 'बाळू'
तुला कोण वेड्या तसा भाव देतो
................................
बाळू घेवारे , धाराशिव
९४२१९७८५९७

No comments:

Post a Comment