तीन गझला : मारोती मानेमोड

 



१.


बोचणारी ठणक तू रांगती पकड 

वेदनेची नस तुझ्या नाचती पकड


हात काळाचा तुला गवसणारही

ट्रेन एखादी कधी धावती पकड


मैफिलीचा स्वर असू दे उशाजवळ 

घुंगराची  नाचणाऱ्या गती  पकड


सार्थकी लागेल बडबड तुझ्यातली 

संयमाची जीभ तू चावती पकड


व्यस्तता ध्यानस्थ होईल शेवटी 

आतल्या मौनातली संगती पकड


तू जगाचा कौल पकडू नको इथे

तू तुझ्या अनुभूतिची शाश्वती पकड


२.


डोहात  कुणी  एकांती  बुडवायचे  मला

एकदा  तरी  काचेसम  तडकायचे मला


याचमुळे  मी  दार घराचे   बंद ठेवले

कधीच नव्हते पुन्हा घरी परतायचे मला


सुरकुतलेल्या चेहऱ्यावरच्या आदिम रेषा

कुण्या युगांच्या गोष्टींना सुचवायचे मला 


मौनावरची कात उदासी  टाकायाची

अन् क्षितिजावर कुणीतरी खुणवायचे मला 


इंद्रधनूच्या पल्याडचे तू ओठ  मला  दे

रंगामध्ये गूढ अशा रंगायचे   मला


फुलणाऱ्यांचे मला फारसे कौतुक नाही

पानासोबत गळणाऱ्या  बोलायचे मला 


नको त्याच मी रस्त्यावरती चालत आहे

नको तेथल्या मुक्कामावर जायचे मला


३.


जवळ फुटका आरसा सांभाळला

मी जसा तुटलो,तसा सांभाळला!


गरज होती विस्तवाची शेवटी

ओंजळीतच कोळसा सांभाळला


याद आली की तुझी घोटाळतो

काळ प्रेमाचा असा सांभाळला


जाहलो विस्तीर्ण कारण की तुझ्या 

मी वडाचा वारसा सांभाळला


संपल्या प्रेमातल्या खाणाखुणा 

का तरी ओठी ठसा सांभाळला


मोडता येणार नाही यार हो

मी जगाचा भरवसा सांभाळला


मी व्यथा सांभाळली गर्भातली

मी जुना माझा वसा सांभाळला


....................................................

1 comment:

  1. व्वाहहह राया सर... क्लास वन सगळ्या 👌👌👌

    ReplyDelete