तीन गझला : रमेश बुरबुरे

 



१.


विकाया काढले तर भाव कवडीमोल टपराचे

कितीदा डोरल्याने प्राण  वाचवलेत  शेताचे


स्वभावाने कडक असतो,दगड समजू नका त्याला

दिसत नसले तरी असते तुटत काळीज बापाचे


तिला अर्ध्याच आयुष्यात आला वाक पाठीला

स्वतःच्या मारुनी पोटास  भरले पोट लेकाचे


नवा  गणवेश  दरवर्षी  मला तो द्यायचा घेउन

भले घालायचा मग वर्षभर बनियान ठिगळाचे


कसा समजू अडाणी मी निरक्षर जन्मदात्यांना

मला  त्यांनीच  सांगितले  खरे श्रेष्ठत्व पेनाचे


२.


माझियापश्चात गझलांना तुम्ही ठेवा

मोरपंखासारखे सांभाळुनी ठेवा


शेवटी ठेवा तिच्या मांडीवरी  डोके

गझलची माझ्या उशाशी डायरी ठेवा


फार काही चांगले लिहिलेच नाही मी

चार शेरांची मुकम्मल ओळखी ठेवा


झेप गरुडासारखी ठेवा खयालांची

त्यातली खोली समुद्रासारखी ठेवा


यापुढे पत्कारती  शरणागती  शस्त्रे

गंजलेल्या लेखण्यांना परजुनी ठेवा


३.


बघता बघता एक आणखी वर्ष बदलले

ना त्यांचे उत्तर, ना अमुचे प्रश्न बदलले


मरण यातना सोसत आहे झोपडपट्टी

या शहराचे नाव तेवढे फक्त बदलले


एक वेळचे बाप बदलवू म्हणायचे ते

त्यांनी सुद्धा खुर्चीसाठी पक्ष बदलले


डसावयाची नियत बदलली नाही त्यांची

केवळ इथले जुने विषारी सर्प बदलले


रंग बदलले नसेल जितके सरड्यानेही

तितक्या वेळी महाशयांनी वस्त्र बदलले


...................................................

3 comments:

  1. बढ़ीया बंधू.. क्लास 👌👌👌

    ReplyDelete
  2. वाह, जबरदस्त,👌👌💐💐❤️❤️

    ReplyDelete
  3. वाह दादा अप्रतिम 💐💐❤️❤️

    ReplyDelete