दोन गझला : डॉ. संजीवनी तोफखाने

 



१.


गर्दीत जावयाला मन घाबरून जाते 

बघता अनोळखींना ते बावरून जाते 


जाताच तोल वाटे भीती पडावयाची 

तितक्यात कोण येते, अन् सावरून जाते 


संवाद वेदनेशी मी साधते अशी की 

ती अंतरात हलते, अन् हादरून जाते 


आई जरी दिसेना हृदयात मात्र आहे 

स्वप्नात येत माया ती पांघरून जाते 


अल्पायुषीच जाई, खंतावते कधी का ?

जगती सुगंध अपुला ती अंथरून जाते 


मायेत रंगलेला सारा तुझा पसारा

कळते परी न वळते मी गांगरून जाते


२.


हळुवार गीत झाले अलवार अक्षरांचे 

लिहिलेत लेखही मी दमदार अक्षरांचे 


गगनात लाख तारे फुलतात रोज रात्री 

दिनरात वेचते मी दळभार अक्षरांचे 


नजरेत भावनांचे उठती तरंग जैसे 

भरतात काळजाशी दरबार अक्षरांचे 


नियमात राहुनी ज्या गझला लिहीत गेले 

अनुशासिते तयांना सरकार अक्षरांचे 


कवनात निर्गुणाचे गुणगान गुंफले मी 

विसरू कसे कळेना उपकार अक्षरांचे 


घडवेन अक्षरांचे अभिजात छान लेणे 

तरिही न मात्र देणे फिटणार अक्षरांचे


...................................................

No comments:

Post a Comment