तीन गझला : मीना शिंदे

 



१.


सांज सावळी, मेघ सावळा,  शामल असतो पाऊस

आठवणींच्या कोसळणाऱ्या सरीत भिजतो पाऊस


कातरवेळी विरह, वेदना उदास बसता दारात

तिला छेडतो, तिच्या पापण्या ओल्या करतो पाऊस


हल्ली हल्ली कॉफी प्यावी वाटत नाही पावसा

कपात माझ्या कॉफिभोवती माझा नसतो पाऊस


भात लावणी बघता बघता प्रेम कोवळे पेरले

हिरव्या-पिवळ्या शेतांमधला पहिला स्मरतो पाऊस


मैत्रीणींचा ताफा निघता भिजण्यासाठी पावसा

मुसळधारसा कोसळतो अन् उनाड बनतो पाऊस


खिडकी आणिक पाऊस  तिचे नाते आहे वेगळे

वय सोळा ते साठी आली ;  सरसर सरतो पाऊस


२.


वादळाने टाकले उधळून तेव्हा

घेतले नाही तुला समजून तेव्हा


दोष देऊ प्राक्तनाला की स्वतःला

शब्द नव्हते ठेवले परजून तेव्हा


घेरले आषाढ मेघांनी तुला अन्

पाहिली सौदामिनी जवळून तेव्हा


भेटण्याचे टाळले होते तुला मी

वेदनेला प्यायले कोळून तेव्हा


दुःख माझे एकदा मेघास कळले

पावसाने घेतले बरसून तेव्हा


३.


बंधुता, समता शिरावर ; मज दुजे छप्पर नको

शेंदराने माखलेला एकही पत्थर नको


माणसाचा जन्म माझा जात मी का पांघरू ?

जन्मतः लावाल जातीचे मला लक्तर नको


एक घेता एक मोफत सेल आहे लागला

रक्तदाबासोबती रक्तामधे साखर नको


मी तुझी अन् तूच माझा एकमेका सांगतो

लग्न केव्हा बोल आधी आज विषयांतर नको


मन जरा उध्वस्त आहे त्रस्त आहे आज का ?

अंतरीच्या वादळाला सागरी बंदर नको


रोज अत्याचार झाले कोर्ट देते तारखा

न्याय मिळताना अता वय गाठणे सत्तर नको


बाग माझ्या भोवताली आज गझलांची असे

मी सुगंधी होत आहे वेगळे अत्तर नको 


....................................................

No comments:

Post a Comment