दोन गझला : अविनाश चिंचवडकर

 


१.


हा असा प्रहर काय करू मी? 

भासतो जहर काय करू मी? 


मी तुझा विरह साहत रात्री 

जाळतो जिगर काय करू मी?


हाय हा बहर, जीवच घेई 

त्यात ही नजर काय करू मी? 


तू मला फुलव आज सखे गं 

मी खुळा भ्रमर काय करू मी?


मी तुला बघत वाट क्रमीतो 

शोधतो शहर काय करू मी? 


दोन जिव एक होउन आता 

होउया अमर काय करू मी?


२.


तू सांग या कळ्यांना हलकेच नाव आता

माझा न बोलण्याचा बनला स्वभाव आता


गुंफून घे तुझ्या या श्वासात सूर माझे

ओठांस गीत माझे हळुवार लाव आता


तेव्हा जरी मनाचा घन कोसळून गेला

मी कोरडेपणाचा करतो बनाव आता


मोडून टाकला मी तो डाव हारणारा 

खेळू पुन्हा नव्याने, ये एक डाव आता


माझ्या तुझ्या व्यथांची दुनियाच ही निराळी

सोसायचे मुक्याने दिलदार घाव आता !


....................................................

अविनाश चिंचवडकर,

बंगलोर

No comments:

Post a Comment