तीन गझला : अश्विन मोरे



१.


आता तहानलेले नेऊ कुठे थवे 

तोडून पाणपोई केलास हायवे 


नाही अजून झाली दोघांमधे युती

एकीकडे चुली अन् दुसरीकडे तवे 


"कणग्या भरून ठेवा यंदाच लोकहो!" 

जागे करून गेले धरणे नि कालवे 


आहे नशेमधे तू नक्कीच काळजा 

आजन्म  वेदनेचे  गातोस  गोडवे 


चढवून काल गेले आहेर जे मला 

त्यांनीच आज केले चारित्र्य नागवे 


२.


घेता न माग आला एकाच उत्तराचा 

घेईल कोण ताबा माझ्या कलेवराचा 


अंतर नसून सुद्धा होता न एक आले 

तू वेगळ्या थराची..मी वेगळ्या थराचा 


आहे सुरूच माझे बदलीमुळे स्थलांतर

शोधा जुन्या घरावर पत्ता नव्या घराचा


इतक्यामुळे शिकारी जाळे बघून रडला 

-घ्यावा कसा बळी मी या वृद्ध पाखराचा


माठामधील पाणी तू एकदाच प्याली 

तुकडा अजून जपतो एकेक खापराचा 


आहे करावयाची माझी मलाच माती 

साऱ्यास देत आहे आभास अंतराचा 


३.


ओढ नजरेतली अपयशी राहिली 

बस निघाली तुझी चौकशी राहिली 


संपली भेट अपुली चहासारखी  

सोबतीला रिती कपबशी राहिली 


धावले  गाव  सारेच  टँकरकडे

दुःख सांगायला हापशी राहिली 


वेदने,तू असे राहिले पाहिजे 

सासरी लेक माझी जशी राहिली 


सर्व फसवे जळाले सहज बंगले  

झोपडी एक बावनकशी राहिली 


वारली माय होताच बाळंतपण 

दूध पाजायला मावशी राहिली 

....................................................

अश्विन मोरे,जि.प.शिक्षक

( मेहकर,बुलडाणा)

ह.मु. तासगाव, सांगली.

मो.9307085550

No comments:

Post a Comment