तीन गझला : शोभा वागळे

 




१.


आयुष्याच्या उत्कर्षाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे

कोठे चुकले सांगायाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे


प्रत्येकाला जग जिंकाया पुढे जायची घाई असते 

संयम धरुनी चालायाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे


नकोत आता भांडण,तंटे आपसातल्या इस्टेटीचे

निःस्वार्थाने वागायाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे


अतिवृष्टीने शेतीवाडी गेली सारी पाण्याखाली

संकट समयी आधाराला तुझ्यासारखा मित्र पाहिजे


त्रयस्थ आता सल्ला देतो कोर्टकचेरी करावयाचा

तडजोडीने मिटवायाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे


२.


कौतुक आता किती करावे या बाईचे!

ध्येय तोकडे कसे म्हणावे या बाईचे


अनेक कार्ये नियमित करते अशी एकटी

चिडणे पण मग खरे नसावे या बाईचे


नीटनेटके घरास जर ती सतत ठेवते

नटणे-थटणे छान असावे या बाईचे


सहनशीलता सदा पाळते लोकांमध्ये

हास्य मुखावर नित्य बघावे या बाईचे


नातेबंधन दोन घरांचे सहज पेलते! 

अनंत गुण हे असे पहावे या बाईचे


हसतमुखाने वाद टाळते मेळ घालते

अजब कलेचे सार्थक व्हावे या बाईचे


उच्च पदावर जसे शोभते रूप लाघवी

घरकुलातही बिंब दिसावे या बाईचे.


३.


या पाठीवर देशाचे, मी ओझे पेलत आहे

देशासाठी प्राणाची, मी बाजी लावत आहे


एकुलता आईचा मी,देशाचा योद्धा आहे 

मृत्यूचे मज भय नाही  सीमेवर झगडत आहे


देशाची भक्ती आहे, त्यागाची उर्मी हृदयी

देशासाठी लढण्याला, मी गौरव मानत आहे


झेंड्याची ताकद पाठी, शत्रूशी लढण्यासाठी

शेवटच्या श्वासाआधी, गनिमाला मारत आहे


नात्यासोबत सणवारा, मी असतो केव्हा कोठे?

मी लढतो शत्रूसंगे, ना सण उपभोगत आहे.


....................................................

शोभा वागळे

मुंबई.

2 comments:

  1. तीनही गझला छान आहेत👌👌💐💐❤️❤️

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर तिन्ही गझला मॅडम

    ReplyDelete