तीन गझला : अनंता

 




१.


मी ठेवतो अताशा सारे  मनात माझे

ऐकून कोण घेतो हल्ली जगात माझे ?


उजवीकडे झुकू की डावीकडे कळेना

आहेत मित्र काही दोन्ही गटात माझे


यादीत खूप वरती होतो म्हणे तिच्या मी

पण नाव शेवटाला झाले कपात माझे


मी आग लावल्याचा आरोप मान्य नाही 

सामील शब्द काही होते कटात माझे


केला जरी सलोखा अन् युद्ध टाळले मी

पण स्वत्व मात्र सगळे गेले तहात माझे


थोडा कुठे जरासा आवाज उठविला मी

अस्तित्व शून्य केले त्यांनी क्षणात माझे


हुजरेगिरीत जेंव्हा प्राविण्य प्राप्त केले

थोडे लिखाण तेंव्हा आले दरात माझे


२.


तू नसल्यावर उरेल माझे जगणे खोटे खोटे

मजेत आहे म्हणत उगाचच हसणे खोटे खोटे


कळण्यासाठी इतके, अवघी हयात गेली माझी

इथे कुणाचे कोणासाठी असणे खोटे खोटे


कमी-जास्त पण दुर्गुण अंगी प्रत्येकाच्या असतो

जगावेगळा आहे मी हे म्हणणे खोटे खोटे


जिथून आलो तिथे परत जर तुला जायचे आहे

मायावी दुनियेत तुझे हे रमणे खोटे खोटे


यावेळी तर बरसावा तो मनाप्रमाणे माझ्या

पुन्हा ढगाचे ठरू नये गडगडणे खोटे खोटे


३.


वाहवा माझ्यापुढे माझी अगोदर होत गेली

सोडली मैफिल...तशी चर्चा अवांतर होत गेली


वागणे साच्यात माझे कोणत्या बसणार नाही 

एवढे कळले...पुढे वृत्ती कलंदर होत गेली


लागला होता जरासा डंख प्रेमाचा मनाला

केवढी त्याची पुन्हा व्याधी भयंकर होत गेली


जीवनाचा प्रश्न सोपा वाटला आधी मला पण

जीवघेणी त्यात गुंतागुंत नंतर होत गेली


सत्यवचनी,सद्गुणी अन् सभ्य व्यक्ती हो ! म्हणाले

ऐकले मी...मात्र पुढची वाट खडतर होत गेली


.................................

प्रा.अनंत देशपांडे, बीड

No comments:

Post a Comment