मराठी गझल : काही गैरसमज

 

प्रिय गझलस्नेही मित्र मैत्रिणींनो,

'गझलकार' सीमोल्लंघन ह्या ऑनलाइन अंकाचे हे सोळावे वर्ष. तुम्हा सर्वांच्या लेखन सहकार्याशिवाय हा भरगच्च विशेषांक अशक्य होता. असेच सोबत रहा. गेल्या चार-पाच वर्षांत प्रत्यक्ष भेटीत, फोन कॉल्सवर, व्हाटस् अपवर अनेक संशोधक, अभ्यासक,  ज्येष्ठ-नवोदित गझलकार यांनी मराठी गझलच्या संदर्भात मला अनेक शंका विचारल्या. त्या अनुषंगाने संपादकीय लिहावं असं मनात आलं. नेहमीच्या संपादकीयापेक्षा हे वेगळं संपादकीय तुम्हाला उपयुक्त वाटावं; कारण या संपादकीयात तुमच्या मनातल्या शंकाचे निरसन करणाऱ्या मजकुराचा समावेश आहे.

गझल हा मूलतः अरबी आणि फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेला साहित्यप्रकार असून त्याची मराठीतली प्रवासगाथा अत्यंत समृद्ध आहे. गझलचे तंत्र, वैचारिक अभिव्यक्ती आणि प्रभावी सादरीकरण शैली यामुळे अनेकांना ती आवडते. त्यामुळेच आजघडीला मराठी काव्यक्षेत्रात  अल्पावधीतच गझलने स्वतःचे अढळ असे स्थान निर्माण केल्याचे आपल्याला दिसते आहे. गझलेला मराठी साहित्यात रुजवण्यासाठी, विकासासाठी अनेकांनी जीवाचे रान केले आहे. तेव्हा कुठे आज या काव्यप्रकाराला एक सशक्त, व्यापक आणि वैविध्यपूर्ण प्रकार म्हणून रसिक स्वीकारताना दिसताहेत. परंतु सोबतच गझलेच्या तंत्राविषयी, आशय अभिव्यक्तीविषयी अनेक गैरसमज कळत न कळत रुजताना दिसत आहेत. फोफावताना दिसताहेत. त्यांना खतपाणी घालणारे तथाकथित मार्गदर्शक आणि त्यांचे अनुसरण करणारे  तीच री ओढताना दिसत आहेत. कोणताही साहित्यप्रकार, कोणत्याही भाषेत जसा आहे तसा रुजतो. आधी भाषा स्वीकारतो. शैली, लालित्य, मांडणी आणि सादरीकरणाच्या माध्यमातून भाषेचे संस्कार अंगिकारतो. हे सर्व होत असताना साहित्यिकही आपले कसब पणाला लावून त्या साहित्यकृतीला अधिकाधिक सुंदर कसे करता येईल याचाच विचार करीत असतो. पण जसजसा काळ पुढे सरकत जातो, तशी भाषाही बदलत जाते. जुने शब्द संदर्भ होतात तर नवीन शब्द त्यांची जागा साहित्यात निर्माण करतात. अनेक ठिकाणी काव्यातील क्लिष्ट नियमांना सोपे करण्यासाठी साहित्यिक जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. तो अपवाद यशस्वी झाला, रसिकांकडून स्वीकारला गेला तर कालांतराने तोच नियम म्हणून स्वीकारल्या जातो. हेही आपण पाहिलं आहेच. त्या अनुषंगाने समज-गैरसमजांचा हा प्रवास प्रत्येक साहित्यप्रकारात असतोच, तसाच मराठी गझलेमध्येही आहे. ज्यामुळे नवोदितांना गझल लिहिताना संभ्रमावस्थेतून जावे लागते. नेमके काय स्वीकारावे हे कळत नाही. जे नेमके गझलेच्या सृजनशीलतेवरच मर्यादा घालते.

आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, गझलचा उगम अरबी भाषेत झाला. पुढे फारसी -उर्दू -हिन्दी असा प्रवास करीत ती मराठीत आली. प्रारंभी अरबी भाषेत लिहिल्या गेलेल्या गझलात रदीफ नसायचा अशी नोंद आहे. गझलचे विषय ईशस्तुतीपासून प्रेयसीच्या सौंदर्यशाली विभ्रमापर्यंत, समाजवादापर्यंत बदलत आलेत. असे असले तरी तिच्या सृजनशीलतेचे आणि अभिव्यक्तीचे कोणतेही बंधन ही परंपरा मराठीवर लादत नाही. म्हणूनच मराठी गझलेची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात सुरेश भट यशस्वी ठरलेत. उर्दू गझलची तांत्रिकता स्वीकारून, मराठीचे भाषिक सौंदर्य अधिक खुलवत मराठी गझलने आज आपली स्वतंत्र शैली विकसित केली आहे.

गझल लिहिण्यासाठी नियमांची गरज असते हे सर्वविदित आहेच. त्याचे काही तांत्रिक नियम आहेत, हे खरे आहे. पण फक्त तंत्र अवगत झाले म्हणजे गझल लिहिता आली असे म्हणणे चुकीचे ठरेल.गझलचे तंत्र जरी शिकले तरी तिच्यामधून अभिव्यक्त होणाऱ्या भावना महत्त्वाच्या असतात. गझल लिहिताना भावना, अनुभव आणि काव्यात्मकता यांचा योग्य समन्वय साधणे आवश्यक असते. केवळ तंत्राच्या आधारे उत्तम गझल लिहिल्या जात नाही आणि ती समृद्धही होत नाही. त्यासाठी सर्जनशील मनाची अधिक गरज असते. 

चौतीस गझलांचा समावेश असलेला सुरेश भटांचा 'रंग माझा वेगळा ' हा संग्रह १९७४ साली प्रसिद्ध झाला. त्याला आज पन्नास वर्षे पूर्ण झालीत. गझलेच्या बाराखडीत 'स्वर काफिया ' बद्दल काहीच उल्लेख नसताना अलीकडच्या पंधरा-वीस वर्षात स्वर काफियाच्या अनेक गझला मराठीत लिहिल्या गेल्या. याचा अर्थ स्वर काफिया आपण उर्दू-हिन्दी गझलांच्या अवलोकनातून- अभ्यासातून मराठीत अंगिकारला. म्हणजे स्वीकारशीलतेने मराठी गझल विकसित होत आहे.ह्या पार्श्वभूमीवर हल्ली गझलसंबंधी असलेल्या काही गैरसमजांचा विचार करूया.


गैरसमज १: गझल अक्षरगण वृत्तात लिहावी. मात्रा वृत्तात लिहू नये.


अनेक जणांचा असा गैरसमज आहे की गझल फक्त अक्षरगण वृत्तातच लिहावी. किंबहुना अनेक मार्गदर्शक अट्टाहासाने सांगतात. मात्र, हे पूर्णपणे सत्य नाही. अक्षरगण वृत्तात नैसर्गिक पद्धतीने लय सांभाळल्या जातेच, त्यामुळे सादरीकरणात कोणताही अडथळा येत नाही. म्हणून अक्षरगण वृत्तात लिहिलेल्या गझलेचा प्रभाव अधिक असू शकतो. पण त्यामुळे गझल त्याच वृत्तात लिहावी हा अट्टाहास योग्य नव्हे. गझल सम्राट सुरेश भटही गझलेच्या बाराखडीत ‘शक्यतो अक्षरगण वृत्तात‘ असाच उल्लेख करतात. याचाच अर्थ गझल वृत्ताच्या कोणत्याही प्रकारात लिहिल्या जाऊ शकते. म्हणूनच गझलकार गझलेच्या लयबद्धतेचा आणि आशयाचा विचार करून आपल्या शैलीनुसार वृत्त निवडण्याचे स्वातंत्र्य घेतो. ते त्याला घेऊ द्यावे. अभ्यासाअंती असे निदर्शनास आले की मात्रावृत्त हे गझलेचे स्वरूप अधिक लवचिक बनवते आणि त्यामुळे आशयाची विविधता सहज स्वरूपात मांडता येते. गझलेतील आशयाची, विषयांची व्याप्ती वाढवता येते. अनेक गझलकार मात्रावृत्तातूनही लय हरवू न देता ताकदीने खयालाची मांडणी करत असतात. त्यामुळे फक्त अक्षरगण वृत्तातच उत्तम गझल निर्मिती होऊ शकते हा भ्रम डोक्यातून काढून टाकला पाहिजे.

गझलकारांनी गझल लिहिताना अनेक वृत्ते हाताळली पाहिजेत किंवा नवीन वृत्ते घडवली पाहिजेत. असाही आणखी एक गैरसमज अक्षरगण वृत्तांच्या बाबतीत गझलकारांच्या मनात असल्याचे निदर्शनास आले आहे. 

अभ्यासाअंती असे लक्षात आले की सुरेश भटांच्या निम्म्या गझला 'आनंदकंद','मंजुघोषा', 'व्योमगंगा', 'देवप्रिया', 'वियद्गंगा' आणि 'राधा' अशा केवळ सहा वृत्तात आहेत. तर ग़ालिब यांच्या निम्म्या गझला 'वैशाख', 'देवप्रिया' आणि 'वियद्गंगा' अशा केवळ तीनच वृत्तात आहेत. 'देवप्रिया' आणि 'वियद्गंगा' ही दोन वृत्ते, ग़ालिब आणि सुरेश भट यांच्या गझलांत समान आहेत. ह्या दोन वृत्तांसह त्यांच्या निम्मे गझलांत आढळणारी ही वृत्ते शतकानुशतके प्रचलित असलेली वृत्ते आहेत. गझलकाराने किती वृत्ते हाताळली? यापेक्षा त्याने ज्या गझला लिहिल्या त्यात प्रतिमांचे नाविन्य (Originality)  किती? हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण गझलांच्या मौलिकतेचा तोच एकमेव निकष असतो.


गैरसमज २: गझलेची भाषा कठीण असते.


गझलकार सोडले तर बहुतांश वाचकांचा हा गैरसमज आहे की गझलेत जी भाषा वापरली जाते ती कठीण असते आणि ती फक्त विद्वान किंवा तज्ज्ञ लोकांनाच समजते. शेराची सूचकता आकलनाच्या कक्षेत येत नसल्याने असा समज होऊ शकतो. बोली भाषा आणि प्रमाण भाषेच्या वापरात जसजसा कठीण , संस्कृतप्रचुर भाषेचा वापर कमी होतो आहे त्याच गतीने गझलेत वापरले जाणारी भाषाही सोपी होत आहे. आजच्या पिढीतील बहुतांश गझलकार सर्वसामान्यांच्या भाषेत लिहिताहेत. त्यांच्या गझलेचे शेर साधे, सोपे तरीही आशयगर्भ आहेत. गझलकार नव्या कल्पना, नवी विषयवस्तू आणि नवा दृष्टिकोन गझलमध्ये आणत आहेत. त्यामुळे गझल ही एका विशिष्ट चौकटीमध्ये न अडकता ती आधुनिकतेच्या दिशेने प्रवास करत आहे. गझलेतील सौंदर्याचा अनुभव घ्यायला ज्ञानाचे बंधन नसते. तिची भाषा हीच तिची ताकद असते. तिच्या अर्थगर्भतेचा अनुभव घेण्यासाठी भाषेचा अडसर येऊ नये.


गैरसमज ३: गझलमध्ये फक्त मराठी शब्दच वापरावे.


गझलेतील शब्दांचे उपयोजन कसे करावे? मराठी गझल असेल तर सगळे शब्द मराठीच असावे असा आग्रह धरला जातो. गझलेमध्ये उर्दू, हिंदी किंवा इंग्रजी शब्दांचा वापर करणे चुकीचे आहे, असा एक मतप्रवाह आहे. तो चुकीचा आहे. अनेक शतकांच्या प्रवासात कितीतरी अन्य भाषांचे शब्द मराठी भाषेत मिसळून एकजीव झालेले आहेत. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गझल हा एक सर्जनशील साहित्यप्रकार असल्याने त्यात विविध भाषांचे, अर्थपूर्ण आणि मराठीत प्रचलित झालेले शब्द वापरून तिची अभिव्यक्ती अधिक समृद्ध करता येऊ शकते. अगदी सुरेश भटांच्या गझलांतही किती तरी गैरमराठी शब्द आलेले आहेत. तो स्वतंत्र लेख याच अंकात मी लिहिला आहे .भाषा ही नेहमीच तात्कालिक असते. ती सतत उत्क्रांत होत असते. बदल स्वीकारत असते. त्या काळातील लोकांना समजेल अशा भाषेत लिहिलेले साहित्यच संदेशवहनाचे कार्य उत्तम करू शकते. एक गझलकार म्हणून त्याला भावनांच्या अभिव्यक्तीसाठी आपल्या भाषेत रूढ झालेल्या इतर भाषांचे शब्द वापरण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. विशिष्ट शब्दयोजनेचे बंधन घालणे म्हणजे गझलकाराच्या सृजनशीलतेवर मर्यादा घालणे होय.


गैरसमज ४: ग्रामीण किंवा बोलीभाषेतील शब्द वापरू नये.


भाषा ही संवादाचे श्रेष्ठ माध्यम आहे. त्यामुळे भाषा कोणतीही असो, कोणाचीही असो, ती संवाद साधू शकत असेल तर तिला श्रेष्ठ मानायला हवे. नाही तर दोन भाषिक समूह एकमेकाला दूषणे देत आपल्या साहित्यिक दिवाळखोरीचा मार्ग सुकर करतील असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जगातली प्रत्येकच भाषा बोली भाषेतून जन्मून उत्क्रांत होत गेली आहे. आजच्या प्रचलित प्रमाण भाषेत ज्या शब्दांना प्रतिशब्द सापडत नाहीत, अशा अनेक शब्दांसाठी बोली भाषेत शब्द आजही उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वरीत साठ टक्के शब्द वऱ्हाडी बोलीतले आहेत, हे पु.ल. देशपांडे यांचे विधान प्रसिद्ध आणि मौलिक आहे. तसेच ज्ञानेश्वरीत आलेल्या  कन्नड शब्दांचा अभ्यासही स्वतंत्रपणे झाला आहे. हे आपल्या मराठी भाषेचे अभिजातपण आहे. त्यामुळेच गझलेत अमुक शब्द वापरू नये हे म्हणणे चुकीचे आहे. याउलट जर बोलीभाषेतील शब्दांनी गझल अधिक प्रभावी होत असेल, सर्वसामान्यांना उमजत असेल, वाचकांशी सहज संवाद साधत असेल तर ती गझलेला व्यापकत्व देणारी ठरते.


गैरसमज ५: स्वर काफिया वापरू नये.


पारंपरिक गझलेत अलामत किंवा उपांत्य स्वराला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे काफियांची संख्या मर्यादित होते. पर्यायाने गझलेतील शेरांची संख्या मर्यादित होते. ज्यामुळे अनेकविध विषय हाताळण्याचे, मांडण्याचे कसब असूनही गझलकार हतबल ठरतो. याउलट स्वर काफिया म्हणजे काफियाच्या शेवटच्या एकाच स्वरावर आधारित काफिया (जसे: 'आ', 'ई', 'ओ') गझलकाराला अनेकविध विषयाचे दालन उघडे करून देतो. बऱ्याच पारंपरिक पद्धतीने लिखाण करणाऱ्या गझलकारांना स्वर काफिया वापरणे गैर वाटते. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, स्वर काफिया वापरल्याने गझलेचे सौंदर्य, आशयघनता आणि विषय मर्यादा वाढते. त्यामुळे गझल अधिक प्रगल्भ होत जाते.


गैरसमज ६: गझल फक्त सौंदर्यावर लिहिली पाहिजे.


काही रुढीवादी गझलकरांचा असा गैरसमज आहे की गझल फक्त प्रेम, सौंदर्य आणि अशा विषयांवरच लिहिली पाहिजे. गझलची सर्जनशीलता केवळ प्रेम किंवा सौंदर्यापुरती मर्यादित नसून ती व्यापक आहे. गझल म्हटलं की अनेकांना त्यात प्रेयसी विषयी वाटणारे प्रेम, सौंदर्याची तारीफ, विरह, दु:ख, आदी भावनाच व्यक्त होतात असं वाटतं. गझल ही फक्त प्रणयधुंद किंवा भावनाशील अभिव्यक्तीपुरती मर्यादित नाही. तर गझल ही कोणत्याही विषयावर लिहिली जाऊ शकते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच वैयक्तिक जीवनातील समस्यांवरही गझल लिहिता येते. वास्तविक, मराठी गझल स्वतःला अशा कोणत्याही बंधनात अडकवून मर्यादित करीत नाही.  गझलमध्ये कोणत्याही भावनांचा अंतर्भाव होऊ शकतो. जीवनातील विविध अनुभव, विचार, आणि समस्या गझलेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्या जाऊ शकतात. ती जीवनातील कोणत्याही विषयावर भाष्य करू शकते. तिला वैविध्यपूर्ण विषय हाताळता येतात, मग ते समाजातील समस्या असोत किंवा राजकीय, सामाजिक विचार असोत.


गैरसमज ७ : 'दीवान' मधली गझल हीच उत्तम गझल.


'दीवान ' म्हणजे गझलकाराने लिहिलेल्या गझलांची विशिष्ट अनुक्रमाने मांडणी केलेला गझलांचा संग्रह. रदीफच्या शब्दांतील शेवटचे अक्षर विचारात घेऊन अकारविल्हे ( Alphabetically) पद्धतीने हा अनुक्रम निश्चित केला जातो. रदीफ नसलेल्या गैरमुरद्दफ गझलांच्या काफियातील शेवटचे अक्षर विचारात घेतले जाते. 

'दीवान'मधली गझलच उत्तम असते आणि इतर गझला त्या मानाने कमी दर्जाच्या असतात. असाही एक गैरसमज आहे. गझलेच्या 'दीवान'मधील गझला उत्तम, सामान्य वा निकृष्ट यापैकी कोणत्याही दर्जाच्या असू शकतात. कारण त्यांचा दर्जा गझलकाराच्या प्रतिभेवर ठरतो. गझलेची गुणवत्ता तिच्या बांधणीतून, मतल्याच्या स्वरूपातून, रदीफ-काफियातून आणि मोजक्या शब्दांत अनुभवजन्य आशय मांडण्याच्या शैलीतून ठरते. त्यामुळे गझल तिच्या स्व-रूपाने गुणवान ठरते, ती एखाद्या संग्रहात अनुक्रमाने कुठल्याही पृष्ठावर असू शकते. सध्याच्या काळात अनेक कवी गझलचे नव्याने प्रयोग करत आहेत, विविध विषयांवर गझल लिहिली जात आहे. त्यामुळे 'दीवान'मधील गझलच उत्तम असे ठाम विधान करणे गझलच्या सर्वसमावेशक आणि विकसित स्वरूपाला कमी लेखणे ठरेल.


गैरसमज ८: गझलेत काफियांची पुनरावृत्ती करू नये.


गझल हा अत्यंत बांधेसूद काव्यप्रकार आहे, ज्यात काफिया आणि रदीफ यांचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गझलेत काफियांची पुनरावृत्ती करू नये हा देखील असाच एक गैरसमज. खरं पाहता, गझलमध्ये काफियांची पुनरावृत्ती केली जाऊ शकते, आणि योग्य ठिकाणी तिचा वापर केल्यास ती गझलची लयबद्धता आणि सौंदर्य वाढवते. काफियामुळे गझलेमध्ये लय निर्माण होते. काफियांची पुनरावृत्ती वेगळ्या खयालाने गझलेच्या सौंदर्यात भर घालू शकते. काफिया हा शब्दसौंदर्य आणि कल्पकतेचे प्रतीक असतो. तो ज्या खुबीने उपयोजित केला जातो त्यामुळे त्या शेराची लज्जत वाढते. जर कवीने एकाच काफियाची पुनरावृत्ती आशयाच्या नावीन्यपूर्ण आयामाने केली, तर गझलेतील सौंदर्य अधिक खुलते. हेही मान्य केले पाहिजे. गझलेत काफिया आणि रदीफ यांचा समन्वय महत्त्वाचा असतो, काफियाची पुनरावृत्ती केल्याने गझलचा प्रभाव कमी होत नाही. हेही तेवढेच खरे. याचा अर्थ काफियांची पुनरावृत्ती सर्रासपणे करावी असा कुणी घेऊ नये.  मतल्यात निवडलेल्या काफियाचे शब्द आपल्या प्रचलित भाषेत कमी असतील तर एकाच अर्थाने, किंवा वेगळ्या अर्थाने काफियाची पुनरावृत्ती संभवते. मराठीत फारशी नसली तरी उर्दू -हिन्दीत काफियांच्या पुनरावृत्तीची अनेक उदाहरणे सापडतात.


गैरसमज ९: गझल बेमतला असू शकत नाही.


गझलच्या रचनेत दोन प्रमुख घटक असतात - मतला आणि शेर. मतला हा गझलेचा पहिला शेर असतो. यामध्ये वापरलेले वृत्त, रदीफ आणि काफिया हा पूर्ण गझलेत वापरला जातो. म्हणूनच यास गझलेची जमीनही म्हणतात. मतल्यात उला मिसरा आणि सानी मिसरा दोन्हींमध्ये रदीफ आणि काफिया असतात. तर शेर हा दोन ओळींचा, ज्यातील फक्त सानी मिसऱ्यात रदीफ व काफिया असतो. हा झाला गझलचा ठरीव आकृतिबंध,परंतु प्रत्यक्षात एखादा खयाल कागदावर उतरवताना तो मतल्याच्या रूपातच सुचतो असे नाही.तर तो बरेचदा स्वतंत्र शेराच्या रूपात शब्दबद्ध होतो. प्रथमदर्शनी आपण असे मानले की प्रत्येक शेर एक स्वतंत्र विचार किंवा भावना व्यक्त करतो आणि प्रत्येक शेराचे स्वतंत्र अस्तित्व असते, तर मतला किंवा बेमतला या गोष्टीला फारसे महत्त्व उरत नाही.जर एकच जमीन असलेले मुकम्मल अनेक शेर असतील आणि त्या रचनेत मतला नसेल तर तिला गझलच म्हटले जाते. अशा बेमतला गझलांची उदाहरणे अत्यल्प आढळतात.

एकूणच गेल्या काही दशकांत गझलच्या स्वरूपात बरेच बदल झाले आहेत हे स्वीकारावे लागतील. आधी गझल ही पारंपरिक चौकटीत बसणारी होती. पण आज गझलचा स्वर अधिक विस्तारला आहे. आधुनिक काळात गझलकार प्रेम, प्रणय, विरह यापुढे जाऊन विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आणि मानवी भावनांवर आधारित गझल लेखन करीत आहेत. त्यामुळे गझल हा साहित्यप्रकार सर्वश्रुत आणि व्यापक अनुभूती देणारा झाला आहे. यामुळे गझलच्या नव्या रूपाची व्याप्ती वाढली आहे. आधुनिक गझलमध्ये समाविष्ट झालेले बदल-


- विषयांचा विविधांगी समृद्ध विचार.

- तांत्रिकतपेक्षा सर्जनशीलतेवर भर.

- अधिक सुलभ सोपी भाषा.

- अनुभूतीच्या वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य.

- अनेकार्थ सूचनक्षमतेवर भर.

- आशयगर्भता, इत्यादी. 


गझल हा साहित्यप्रकार विविधता आणि सर्जनशीलतेचे मिश्रण आहे. तिच्या तांत्रिक बाजूंचा आदर करताना गझलकाराच्या सृजनशीलतेवर कुठलीही मर्यादा घालणे चुकीचे ठरते. गझलच्या लेखनात वृत्त, भाषा, विषय आणि शैली याबाबत गैरसमज न पसरवता गझलचे व्यापक स्वरूप समजून घेणे ही काळाची गरज आहे.

तर गझलकार मित्रांनो 'लकीर के फकीर ' न होता गझलविचाराच्या बाबतीत स्वीकारशील रहा.अधिक विकसनशील व्हा.समृद्ध व्हा.

तुमच्या गझललेखनाला

मनःपूर्वक शुभेच्छा !

- संपादक

....................................................