एखाद्या कलाकृतीचे भाग्य चाळीस वर्षानंतर कसे उजळते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'लोपला चंद्रमा' ही गझल होय. १९८३ मध्ये ही गझल श्रीकृष्णाकडून मला मिळाली. ही गझल 'स्त्रग्विणी द्विरावृत्ता' ह्या वृत्तात आहे.
'सूर्य केव्हाच अंधारला यार हो ' ही गझल 'स्त्रग्विणी 'ह्या वृत्तात आहे.'गालगा'ची चार आवर्तने ह्या वृत्तात असतात. ह्या लगावलीला दुप्पट करून 'गालगा'ची आठ आवर्तने असणारे वृत्त म्हणजे 'स्त्रग्विणी द्विरावृत्ता' हे वृत्त होय. ह्या वृत्तात मराठीत अगदी नगण्य अशा गझला आहेत.'लोपला चंद्रमा ' ही त्यापैकी एक. अशी गझल लिहायला जशी सोपी नसते, तशीच ती संगीतबद्ध करायला पण कठीण असते. गझल वाचता वाचता धून डोक्यात रुंजी घालायला लागली हे मी माझे भाग्य समजतो. गझल गायनाच्या विविध शैली आहेत. त्यापैकी कव्वाली ढंगाच्या अंगाने ही गझल संगीतबद्ध झाली आहे. १९८३ मध्ये स्वरबद्ध झालेल्या ह्या गझलेने महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील माझ्या प्रत्येक कार्यक्रमात उस्फूर्त दाद घेतली आहे. माझी गझल-गायकी ही शास्त्रीय संगीताच्या अंगाने अधिक जाते. पण ही गझल वेगळा ढंग घेऊन कव्वाली शैलीने स्वरबद्ध झाली, हे पण एक आश्चर्यच आहे. मतला तबल्याच्या ठेक्यासोबत व सर्व शेर तबल्याविना मुक्तपणे गायिल्या गेले आहेत. ही यातील खासियत म्हटले तरी चालेल. सर्व शेर मुक्तपणे गायिल्यामुळे विविध सुरावटींनी ते सजविल्या गेलेत. या गझलला पद्मश्री सुरेश वाडकरांचा आवाज लाभण्यासाठी तब्बल चाळीस वर्षे लागली. पण जेव्हा लाभला तेव्हा त्यांच्या मधाळ आवाजाने व लाडिकपणे गायिल्याने या गझलचे सोने झाले, हे पूर्ण गझल ऐकल्यानंतर आपणासही पटेल. कसदार शब्दांना तेवढ्याच ताकदीची सुरावट आणि त्या सुरावटीला तेवढ्याच योग्यतेचा आवाज जेव्हा लाभतो तेव्हा एक वेगळेच 'गारुड' तयार होते. मी जेव्हा ही गझल सादर करायचो तेव्हा सर्व शेर 'हाय पिच'मध्ये सादर करायचो. जेव्हा वाडकरांच्या आवाजात ध्वनिमुद्रण सुरू झाले तेव्हा, "प्रत्येक शेर सारखा घेण्यापेक्षा एक शेर आपण मध्य सप्तकापासून सुरू केला तर चालेल काय?" असे विचारून सुरेशजींनी थोडे गाऊन दाखविले. मलाही ते भावले व मी होकार दिला. त्यामुळे गझलची रंगत अजून वाढली. मी नकार दिला असता तर त्यांनी मूळ सुरावटीप्रमाणे ते गायिले असते आणि वाडकरांचा हाच मोठेपणा आहे. आम्ही दोघेही एकमेकांच्या सूचनांची देवाण-घेवाण करून गीत असो की गझल ती अधिक चांगली कशी करता येईल हे बघतो. सुरावट मनाप्रमाणे उतरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. वाडकरांच्या मोठेपणाचे एक उदाहरण येथे सांगावेसे वाटते. राज यावलीकर यांच्या 'तू दिलेले दुःख आहे प्राण माझा' या रचनेतील दुसऱ्या ओळीतील तार षड्जावरून कोमल गांधाराकडे उतरत येणारी सुरावट जरा कठीण होती. ती बराच वेळ गाऊन गाऊन गळ्यातून उतरविली. ध्वनिमुद्रण आटोपले. त्यानंतर जवळ जवळ एक महिन्याने 'लोपला चंद्रमा'चे ध्वनिमुद्रण होते. हे ध्वनिमुद्रण आटोपल्यानंतर "यावलीकरांची रचना त्या दिवशी माझ्या मनासारखी उतरली नाही" असे म्हणून पुनः पूर्ण रचनेचे ध्वनिमुद्रण एक पैसाही मानधन व स्टुडिओचे भाडे न घेता केले. असो!
'लोपला चंद्रमा'चे संगीत संयोजन जयपूरचे ऋषिकेश सोनी यांनी केले आहे. 'ट्रॅक्स'चे ध्वनिमुद्रण, मिक्सिंग,मास्टरिंग जयपूरच्याच 'रॅप' स्टुडिओत करण्यात आले. सुरेशजींचा आवाज मुंबईला त्यांच्याच आजीवासन स्टुडिओत ध्वनिमुद्रित करण्यात आला. कव्वालीचा बाज स्पष्टपणे दिसण्यासाठी या गझलमधील 'बेंजो' वादनाकरिता राजस्थानातील अलवार येथील प्रसिद्ध बॅंजो वादक फल्लाभाई यांना निमंत्रित करण्यात आले होते. पूर्ण गझलमधील बेंजोवादन आपले लक्ष वेधून घेते. यातील ठसकेबाज तबला/ढोलक वादक आहेत जयपूरचेच दिलशाद खान.
माझ्या आयुष्यातील एकूणच गीत-गझलांच्या सुरावटींवर विचार केला असता 'शब्द शब्द पर लिखा होता है गानेवाले का नाम' असं म्हणावसं वाटतं. आणि त्या त्या रचनांचे प्रत्येक गायक/गायिकेने सोने केले हेही कबूल करावेसे वाटते.
....................................................
गझल तर अप्रतिमच आहे पण संगीत आणि स्वरसाज फार उच्च प्रतीचे असल्यामुळे आणखीनच खुळाली गझल
ReplyDeleteआभार
Deleteअप्रतिम. खूप सुंदर गझल
ReplyDeleteआभार
Deleteवाह... अप्रतिम 👌
ReplyDeleteआभार
Deleteवाह अप्रतिम!
ReplyDeleteआभार
Deleteवाह अप्रतिम रचना व सादरीकरण
ReplyDeleteआभार
Deleteखूपच छान!
ReplyDeleteआभार
Deleteवाह वाह वाह वाह वाह वाह अतिशय सुंदर👌👌👌 क्या बात लोपला चंद्रमा
ReplyDeleteआभार
Deleteअतिशय सुंदर गझल व त्यावर चढवलेला स्वरसाज..
ReplyDeleteआभार
Deleteअतिशय सुंदर
ReplyDeleteआभार
Deleteव्वा अप्रतिम गझल, उत्तम स्वरसाज👍👌👌
ReplyDeleteआभार
Deleteवाह.... अप्रतिम गझल व गायनही 👌👌👌🙏
ReplyDeleteअतिशय सुंदर गझल आणि अप्रतिम गायन मनाला भावणारे गीत
ReplyDelete.मनात ही गझल रुंजी घालत राहते.शब्द, ताल,सुर संगीत सगळेच अप्रतिम!
ReplyDelete