पाच हझला : कालिदास चवडेकर





१.


होत असते सारखी खुजली विनाकारण

निघत असते आणि मग खपली विनाकारण


कोण करते सारखी चुगली विनाकारण

आरशावर राहिली टिकली विनाकारण?


लोटतो लोंढा बुवांच्या आश्रमांमध्ये

वाटते की ही पिढी शिकली विनाकारण


'काय तोंडातून येते पाहुया त्याच्या'

टाकुनी ती पाहते गुगली विनाकारण


काय? झारीतील शुक्राचार्य होता तो?

होत असते काय मग बदली विनाकारण?


खिळखिळे पायास आतूनीच केलेले 

वाटते का भिंत ही खचली विनाकारण?


शांत बसलेल्या व्यथेला छेडले कोणी

लेखणी का पेटुनी उठली विनाकारण?


२. 


पान खाउन खास आलो पण तरीही वास आला

घोळुनी मुखवास आलो पण तरीही वास आला


पार हलकी ठेवलेली पाउले जडशीळ माझी

रोखुनी मी श्वास आलो पण तरीही वास आला


चाचरत बोलावयाची वेळ ती नव्हतीच पहिली

मारुनी बकवास आलो, पण तरीही वास आला


मारली कामास दांडी, केवढा पण जाम ट्रॅफिक

सोसुनी मी त्रास आलो, पण तरीही वास आला


पाळुनी गळ आणि शपथा रिचवला तो लार्ज प्याला

सोडवूनी फास आलो, पण तरीही वास आला


फोन आलेला घरातुन, 'या घरी लवकर जरासे'

झोडुनी सुग्रास आलो पण तरीही वास आला


जायचे नाही कुठेही, ठरविले होते मनाशी

लपवुनी ते ग्लास आलो, पण तरीही वास आला


३.


आणतो भाजी, किराणा, मी कुठे नाही म्हणालो

पेलतो हा बारदाना, मी कुठे नाही म्हणालो


मौन होण्यानेच सारे वाद मिटती एकदाचे

सोडला मी ताठ बाणा, मी कुठे नाही म्हणालो


फिरत असतो मी घरातच, दिवसरात्री बैल बनुनी

म्हण हवेतर तेलघाणा, मी कुठे नाही म्हणालो


उघडुनी कीचनमधे त्या शोधतो सारे डबे मी

कोंबतो तोंडी बकाणा, मी कुठे नाही म्हणालो


मी न काही ऐकलेले, घातले कानात बोळे

बोंबलू द्या ती ठणाणा, मी कुठे नाही म्हणालो 


४.


समोर येइल ते ते वारेमाप गटकतो मित्रा

बील द्यायच्या वेळेला हमखास सटकतो मित्रा


फोन तुझा स्विच ऑफ कधी, तर कधी लागतो बीझी

बिनकामाचा दिवसरात्र तू कुठे भटकतो मित्रा


बोलत होता जेव्हा तो, वाचाच तुझी बसलेली

तो गेल्यावर कशास आता ग्लास पटकतो मित्रा


तिची नि माझी जिथे चोरुनी भेट व्हायची असते

त्याच ठिकाणी तू मजला हटकून लटकतो मित्रा


वेळच नसतो तुला एरवी माझ्याशी बोलाया

कामाच्या वेळेसच का मुद्दाम अटकतो मित्रा


समोर माझ्या एक बोलतो समोर त्यांच्या दुसरे

हाच तुझा तर स्वभाव मजला खूप खटकतो मित्रा


तुझ्यावरी भरवसा ठेवुनी जमवुन बसतो मैफिल

आणि आयत्या वेळेला तू का न फटकतो मित्रा


५.


कोणत्या सटवीस करतो फोन हा नवरा दिवसभर

कोण कैदाशीण करते लाघवी नखरा दिवसभर


तासभर बाहेर जावे घर तयावर सोडुनी तर 

आवरावा लागतो मग ढीगभर कचरा दिवसभर


एकदा घेऊन येतो, लाखदा सांगून त्याला

मिरवुनी साऱ्या जगाला दावते गजरा दिवसभर


नेसली साडी नवी एखाद-दुसरी छानपैकी

अंगभर भिरभिरत जाती बोचऱ्या नजरा दिवसभर


भेटता सुट्टी कधीही पसरतो सोफ्यावरी अन्

चरत असतो सारखा काहीतरी बकरा दिवसभर


तोंड दाबुन मार बुक्क्यांचा करावा सहन रोजच

दाखवावा लागतो पण चेहरा हसरा दिवसभर


...................................................

No comments:

Post a Comment