तीन गझला : सौ.कविता शिरभाते

  




१.


जिंदगीभर वेदनेचा भार भोगाया

एक दिवसाचा इथे सत्कार भोगाया 


कवडसा येतो, दिलासा तेवढ्यापुरता

जन्म हा बाकी जणू अंधार भोगाया


*वंचना, अपमान, दुःखे, कोंडमारा हा*

*फार म्हणजे, फार म्हणजे, फार भोगाया*


ही ठणक बाईपणाची सांगते आहे

*पारतंत्र्या, तूच तू मिळणार भोगाया*


कोणता पर्याय नाही सोसण्यावाचुन

ही जखम वाट्यास हिरवीगार भोगाया


या व्यवस्थेला अता सांगून दे बाई

राहिली नाहीस तू लाचार, भोगाया 


२.


जीवनाचा अंत झाला शेवटी

भेटण्या मृत्यूच आला शेवटी


प्रेयसीला अंत्यदर्शन घेउ द्या

मग मला मातीत घाला शेवटी


भाग पडले सोडणे शाळा मला

भाकरीचा प्रश्न आला शेवटी


भावनेला गर्भ नाही राहिला

शब्द वांझोटा निघाला शेवटी


धावतो प्रत्येक जण आयुष्यभर

भेटले मृगजळ कुणाला शेवटी


तो कधी येणारही नव्हता पुन्हा

पण तरी भेटीस आला शेवटी


३.


नाश होतो जीवनाचा 'मी' पणाने आजही

जिंकले आहे जगाला संयमाने आजही


हुंदके दाबायचे अन् आसवांना प्यायचे

का जगावे बायकांनी दीनवाणे आजही


खाचखळग्यांनी अडवले आजवरती शेकडो

शोधला रस्ता तरीही निर्झराने आजही


वाकुनी किंचित खुबीने मी लढाई जिंकली

हार मग मंजूर केली वादळाने आजही


घेतला गळफास नंतर कर्जमाफी लाभली

केवढे उपकार केले शासनाने आजही


राहिली होती सुखाच्या कल्पनेने कोरडी

ती खरी समृद्ध झाली संकटाने आजही


अंतरीचा देव नाही पाहिला आयुष्यभर

देव पाषाणास केले माणसाने आजही


....................................................

No comments:

Post a Comment