तीन गझला : सौ.वैशाली भागवत बडोदे

 




१.


असेल कोणी मोठा येथे असेल कोणी भारी

स्पर्धेमध्ये राहिल कायम माझी मक्तेदारी  


‘निवृत्ती’च्या हातामध्ये हात दिला मी माझा   

तसे अचानक थेंब सुखाचे आले माझ्या दारी


मनात माझ्या डोकावत मी जेव्हा जेव्हा गेले  

समजत गेली तशी मला मग सगळी दुनियादारी 


अरे सुखा तू पाहुणचारासाठी थोडा ये ना  

पहा केवढे व्यथेचे मळे फुललेत परसदारी 


सोपा नाही खरेच इतका प्रवास आयुष्याचा 

क्षणाक्षणांचा हिशोब टिपतो आहे ‘तो’ दरबारी 


पक्ष बदलला एवढेच का झाले कारण त्याला 

भाव केवढा वाढत गेला खुर्चीचा बाजारी  


रोखठोक मी व्यवहाराला आहे ध्यानी ठेवा    

चालत नाही वैशालीला कुठलीच उसनवारी  


२.


पूर्ण जन्म नेहमीच भोगण्यास पाहिजे

मोक्ष तेवढा तरी मिळावयास पाहिजे


भेटतो इथेच कृष्ण हाक मारशील जर 

अर्जुनासमान फक्त आर्त ध्यास पाहिजे 


कुंडलीत मांडलेत केवढे हिशोब ते 

मर्म प्राक्तनातले कळावयास पाहिजे 


वेदनेस सांगतोय चाल तू जरा हळू 

रान मोकळे जरा इथे सुखास पाहिजे

  

स्वर्ग नेमका असेल जर बघायचा तुला  

पेटण्यास अंतरात ‘वात’ खास पाहिजे 


३.


मृत्यूलाही निधडे होउन भिडल्यानंतर  

सत्य कळाले मोह जरासा सुटल्यानंतर 


पुढे टाकले पाउल माझे सांभाळत मी   

मनात शंका होती तीही फिटल्यानंतर 


नोंदी होत्या आत्म्यावरती गतजन्माच्या  

तीच शिदोरी सोबत माझ्या...जगल्यानंतर 


दुनियेच्या या जत्रेमध्ये भरकटले मी 

ऐकत गेले मग हृदयाचे ...कळल्यानंतर  


तुझ्यामुळे तर कळले जीवन.. खरे सांगते   

गझल होउनी जीवनात तू असल्यानंतर 


...................................................

वैशाली भागवत, बडोदे

2 comments:

  1. सुंदर गझला..
    तिसरी गझल खूपच आवडली.

    ReplyDelete