तीन गझला : नारायण सोनवणे

  




१.    

     

दोघांचाही संयम सुटला आहे

दोघांनाही एकच थांबा आहे


श्वासांचे ऋण श्वास लागले फेडू

धुंदीसाठी अत्तर वारा आहे


तिचाच विळखा गळ्याभोवती त्याच्या 

पुरता बाहू-पाश टाकला आहे


देह-समेवर ठेव चिरंतन माथा

तुझी व्हायची पूर्ण सांगता आहे


सगे-सोयरे रोज कुणाच्या दारी

भेटीसाठी लग्नसोहळा आहे


किती पावले आली आणिक गेली

दारी झिजला एक उंबरा आहे


सांग आठवा तुला कसे विसरावे

पुन्हा पुन्हा पाठांतर पाढा आहे


२.   


नकोत नुसत्या आठवणीला काढत जाऊ

बागेमध्ये चल वरचेवर भेटत जाऊ


लाख पहारे आणि बसू दे अडवित वाटा

आपण दोघे तो पायंडा मोडत जाऊ


खूप दुरावा जरी वाढला नात्यांमधला

जमेल तेंव्हा जमेल तितके बोलत जाऊ


मने दुभंगुन गेली अवघ्या मतभेदाने

विश्वासाने ऐक्य, सलोखा रुजवत जाऊ


अवघी फिरतो दुनियादारी कुठे विसावा

कुशीत आई पुन्हा वाटते रांगत जाऊ


नभ-धरणीचे नाते असते द्वैत पलिकडे

उन-वाऱ्याची नकोत दुषणे वाहत जाऊ


जात आडवी येते आणिक तेढ माजते

मग बुद्धाला शांतीसाठी वाचत जाऊ


३.


उन्हे तापायच्या आधी जराशी सावली शोधू

कुणाची वाटली झाडे? कुणाची मालकी शोधू?


तसेही पाय ठेवाया हवी ती केवढी जागा

इथे भेटायची नाही विटेची पंढरी शोधू


उभ्या दिंड्या पताका नाचताना थांबली वारी

कुण्या पायी विठूची चाललेली पालखी शोधू


मनाच्या आर्त हाकेला कुणीही ओ दिली नाही

तुझा धावा कुणासाठी जिव्हाळा अंतरी शोधू 


भरोसा आज नाही राहिला आहे कुणाचाही

शिकारी पारद्यांनी गुंफलेली साखळी शोधू


सुखे व्हावीत आनंदी घरीदारी समाधानी 

कशाला चाड दुःखाची भुकेला भाकरी शोधू


कुणी गावी दिली हाळी पुन्हा ती वांझ झाल्याची

निराशा माय-मातीच्या मनाची पातळी शोधू


....................................................

नारायण सोनवणे,

कोपरगाव, 

अहमदनगर

No comments:

Post a Comment