तीन गझला : रामदास घुंगटकर

 



१.

दिसतात चार भिंती ज्या रोज पाहतो मी
माझ्या सुखी घराचा पत्ता विचारतो मी

धागे असून पक्के, तुटतात फार हल्ली
झाल्या जुनाट गाठी, हळुवार सोडतो मी

काट्यातही फुले का हसतात ही सुगंधी?
साधाच प्रश्न माझा त्यांना विचारतो मी

चाळून पुस्तकांची झालीत जीर्ण पाने
भरले कपाट आता, माणूस वाचतो मी

त्यांची विमान-यात्रा लखलाभ हो तयांना
दारिद्र्य झोपडीचे गावात राखतो मी

कळणार काय त्यांना वाचाळ तर्क ज्ञानी
तत्वार्थ बोध साध्या शब्दात मांडतो मी

२.

काट्यातही फुलांना फुलणे जरूर आहे
विसरून दुःख थोडे हसणे जरूर आहे

अदृश्य घाव झाले सोसून वेदना त्या
टाके भरून पुन्हा शिवणे जरूर आहे

आयुष्य चालताना वाटेत रोज मृत्यू
मरण्यातही जरासे जगणे जरूर आहे

नाही अजून कळले श्रीमंत कोण येथे ?
सारेच सोडताना रडणे जरूर आहे

जखमा सुकून झाले नासूर अंतरीचे
अश्रूत वेदना त्या गळणे जरूर आहे

उघड्यावरी तुझा हा संसार रामदासा
सैराट वादळाशी लढणे जरूर आहे

३.

आयुष्य जाळले अन् तेव्हा तयार झालो
खचणार ना कधीही पक्की दिवार झालो

अनमोल अक्षरांचे वाटून दान केले
उरलेत श्वास काही बाकी उधार झालो

थोडी विनम्रतेने केली मवाळ वाणी
शत्रू समोर येता त्यांचाच यार झालो

व्यवहार ना कळाला होतो जरा अडाणी
खेटून संकटांना आता हुशार झालो

जलधार तू प्रवाही, ना थांबली कधीही
मी वाहत्या नदीला नुसती किनार झालो

अडवून वादळाला, घरकूल राखताना
नाही कधी कुणाला फुकटात भार झालो

....................................................
रामदास घुंगटकर,
पुसद,
९६२३७६५३०२

No comments:

Post a Comment