तीन गझला : डॉ.शुभांगी कुलकर्णी

 




१.


कुणाला जीवनाइतके कधी मी वाचले नाही.

पुढे त्याच्याप्रमाणे थोर कोणी भेटले नाही 


जमा केलास प्रेमाचा किती  गोतावळा गझले

गटाला मी  तशी कुठल्याच परकी वाटले नाही 


किती निर्व्याज मैत्रीही पुढे झालीच दुःखाशी 

कुठे रस्त्यात त्याला एकटे  मग सोडले नाही 


भली मोठी तिची सवलत पुन्हा चालून आली पण 

क्षणिक मी फायद्यासाठी चुकीवर भाळले नाही 


मनाच्या जीर्ण धाग्यांना नव्याने घातले टाके 

उसवली संकटाने वीण पण ते फाटले नाही 


उभे होते किती अडसर तुझे प्रत्येक मार्गावर 

नदी होते म्हणुन बहुधा  कधी मी साचले नाही 


गुलाबी भांडणे होती तुझ्यामाझ्यात आयुष्या

तरी दोघांतले अंतर  कुठेही वाढले नाही. 


२.


कच्चे रस्ते फसव्या वाटा...गुंतत गेला 

आयुष्याचा पत्ता माणुस हुडकत गेला 


माहित नाही केंव्हा भिनली पद्धत इथली 

कोणाचे खापर कोणावर फोडत गेला 


जो तो उठसुट धावत होता पैशासाठी

माणुस वेडा धावत गेला, वाहत गेला 


बोचत गेले धोका देणे सौख्याचे अन् 

निःसंशय तो दुःखावरती भाळत गेला 


प्रगतीच्या शहरी वाटेने डोळे दिपले

गावाकडच्या माणुसकीला तरसत गेला


सहवासाची किंमत त्याच्या व्हावी म्हणुनच 

दोघांमध्ये अंतर थोडे राखत गेला


जेंव्हा कळले झिजल्यावाचुन दरवळ नाही

तो देहाला कायम चंदन बनवत गेला


बापाचे मन कळले 'बाबा ' झाल्यावरती

तळ बापाच्या हृदयाचा मग गाठत गेला


इच्छा आहे एकच कारण दुःखाचे ,पण 

माणुस इच्छा खोट्या खोट्या मारत गेला


३.


चालला उपचार हा दिनरात दुःखावर 

अन् पुन्हा झाला नवा आघात दुःखावर 


काल चर्चा गावभर त्यांचीच झडलेली 

वेदना तर भाळली जोशात दुःखावर 


एक हट्टी सुख पुन्हा पेटून उठल्यावर

राज्य करते जिंकुनी निष्णात दुःखावर 


लांघते त्याची परीक्षा मी सरावाने 

अन् बरसते लाघवी अर्ध्यात दुःखावर 


वावडे असते कुठे गझलेस कोणाचे?

लावते ती जीव पण  कुख्यात दुःखावर 


ऐकली होती सुखाची  थाप हलकीशी 

ठेवली पाळत उभी दारात दुःखावर 


टाकले वाळीत जेंव्हा त्यास लोकांनी

चुंबने उधळून घे थाटात दुःखावर 


....................................................

No comments:

Post a Comment