१.
काळ गेला तरी शेवटी राहिली
माणसे मूठभर रानटी राहिली
पावसाला किती रोज सोसायचे
फक्त बाकी इथे ढगफुटी राहिली
फार सांगू नको वेगळी राहिली
भेट भेटींमधे चोरटी राहिली
ठार केली असा आव आणू नको
पाल गेली पुढे शेपटी राहिली
गाव सोडून शहरात मी एकटा
मी इथे,ती तिथे एकटी राहिली
२.
कोण कशाला झुरते आहे?
प्रीत आपली फुलते आहे
प्रेम-बीम झालेले नाही...
फक्त मला आवडते आहे
सुरू ठेवला एक झरोका
तुझी आठवण छळते आहे
सच्छिद्र बहुधा माठ मनाचे
दु:ख तुझे पाझरते आहे
नकोस देऊ नव्या वेदना
जखम जुनी भळभळते आहे
३.
नाही अजून माझ्या हातात पावसाळा
देऊ कसा तुला मी वचनात पावसाळा
हो,एवढ्यात त्याला बोलू नका कुणीही
आला अजून कोठे बहरात पावसाळा
मी बारक्या सरींची बांधून मोट येतो
जे सांगते मलाही कानात पावसाळा
भरपावसात एका बाबा निघून गेले..
जो राहतोच कायम लक्षात पावसाळा
मी तोकड्या मनाचे बांधू धरण कशाला?
अंधारल्या दिशा अन् डोळ्यात पावसाळा
का वागतो नव्याने वैऱ्यासमान तोही
घेऊन जायचा का मसनात पावसाळा
...................................................
गौतम राऊत,
ब्रम्हपुरी,चंद्रपूर.
No comments:
Post a Comment