तीन गझला : दिगंबर खडसे

 



  

१.


लेटेस्ट अन् थोडी बरी दाखव मला

आतातरी स्वप्ने नवी दाखव मला


नुसतीच गर्दी माणसांची भेटते

त्यांच्यामधे अस्सल कुणी दाखव मला


नाही स्मरत मुखडा तिचा होता कसा

चित्रातली आईतरी दाखव मला


विश्वास मी ठेवू कसा ह्या मेलवर

त्याची कुठे आहे सही?दाखव मला


भेटायला का मीच यावे नेहमी ?

केव्हातरी ईच्छा तुझी दाखव मला


तू चांगली म्हणतो तिला हे मान्य पण 

दुनिया कुठे आहे खरी दाखव मला


२.


मनाच्या आत एकांती रूजाया लागतो मिसरा 

कुण्या कातर क्षणाला मग फुलाया लागतो मिसरा


कुणाला चाळता कळतो कुणाला वाचता कळतो

कुणाला सोसल्यावरती कळाया लागतो मिसरा


कधी मी विश्व हे जेव्हा तुझ्या डोळ्यांमधे बघतो

तिथे डोहामधे माझा दिसाया लागतो मिसरा


उमटतो मोरपंखी व्रण जिव्हारी दंश होताना

जिथे बेभान जन्माला डसाया लागतो मिसरा


अशी दृष्टी तुला मित्रा गझल देऊन जाते की

जिथे जातो तिथे नुसता दिसाया लागतो मिसरा


रितेपण आतले जेव्हा चराचर व्यापुनी घेते

कुण्या आतूर गझलेचा स्मराया लागतो मिसरा


३.


जायचे होते कुठे? मी चाललो आहे कुठे?

हे कळाया मी घडीभर थांबलो आहे कुठे?


कोणती सांगू निशाणी चेहऱ्याची यार मी

एकदाही मी स्वतःला भेटलो आहे कुठे?


मी उभा होणार नक्की यापुढेही वादळा

वाकलो होतो जरासा मोडलो आहे कुठे?


तू भले असशील राजा या क्षणी वस्तीमधे

मी इशाऱ्यावर तुझ्या पण नाचलो आहे कुठे?


ह्याचसाठी घेतली की कंपनी द्यावी तुला 

झिंगण्यासाठी इथे मी बैसलो आहे कुठे?


हे खुले आकाश माझे, हाच माझा पिंजरा

मी गझल सोडून सांगा गुंतलो आहे कुठे?


....................................................

दिगंबर खडसे 

अकोट जि.अकोला

No comments:

Post a Comment