तीन गझला : सौ.स्नेहा शेवाळकर

 




१.


आठवणींना कुलूप लावत कायम अडवत होते 

म्हणून बहुधा हळवे माझे मन आक्रंदत होते


दारामधले सुख आताशा वाटत नाही सख्खे 

ठाण मांडले घरी व्यथेने मनास सांगत होते 


राग, लोभ अन् रुसण्यावाचुन संसारी ना गोडी 

प्रेम आमुचे त्याचमुळे तर कायम वाढत होते 


किती असू दे जात, धर्म वा पंथ वेगळे इथले 

माणुसकीचे बंध रेशमी सदैव जोडत होते 


पंखांमध्ये बळ आल्यावर पक्षी उडून गेले 

जुन्यापुराण्या आठवांस मी नाहक चाळत होते 


आसू लपवत पापण्यांतले सदैव हासत होते 

सुखाआड मी दुःखाला तर  सदैव लपवत होते


दोष दाखवत परस्परांचे जरी राहतो दोघे 

याचमुळे तर मनामनाचे अंतर वाढत होते 


२.


किती विश्वास होता ठेवला केवळ तुझ्यावर 

कळेना आज वाटा ह्या कशा झाल्या समांतर 


कशाला पावडर, लाली नवी लावू मुखावर 

चढे जर रक्तिमा गाली सख्याने स्पर्शल्यावर 


हवासा वाटतो वारा सुखाचा जीवनाला 

लढाई रोज दुःखाशी सतत मी हारल्यावर 


शिवत गेले नशीबाचे ठिगळ कायम तरीही

उसवली मात्र नाती नेमकी का सांधल्यावर 


किती उपदेश तू मूर्खास केला पण तरीही 

कुठे समजून घेतो तो... जणू पाणी घड्यावर 


पुढे येताच तू तर शब्द सारे मूक होती

सुचत नाहीच काही, बोलते केवळ अवांतर


नव्याच्या स्वागताला सज्ज झाले मी अताशा 

जुन्या खुळचट प्रथेला नेहमी मग टाळल्यावर 


३.


उशाखाली मऊ शय्या दिसे सुंदर 

सुखाची झोप कोठे लागते त्यावर


मनाचा स्वच्छ केला कोपरा जेव्हा 

जुना अंधार गेला आतला सत्वर 


नव्याने पालवी फुटली उद्याला जर 

स्त्रवू दे कातळाच्या आतला पाझर 


लढाई तीव्र मी दुःखासवे केली 

तसा बहरू सुखाचा लागला मोहर 


जरी ना राहिली संवेदना आता 

उमटतो वळ उरामध्ये कसा नंतर


प्रतीक्षा संपली आहे यशाची जर 

नभामध्ये भरारी मार तू लवकर 


अपेक्षांना मनाच्या घाल तू आवर 

पहावी आपली झोळी तशी चादर 

..................................................


No comments:

Post a Comment