१.
मैफलीतुन ती जशी उठली अचानक
तान माझी त्याक्षणी विरली अचानक
जोवरी ती बैसली होती समोरी
तोवरी स्वरसप्तके फुलली अचानक
ऐनवेळी जायचे किंवा अबोला
नेहमीची सवय ती स्मरली अचानक
ती जशी गेली तसे मज भासले की-
बैठकीची शान नासवली अचानक
सूर माझे मी स्वतः शी लावताना
तार तंबोऱ्यावरी तुटली अचानक
गात जा विचलीत तू होऊ नको रे
शेवटी 'शोभा' असे वदली अचानक
२.
काळे, कुरळे केस पुढे कर, फूल माळतो जरा
वेणी, गजरा काय हवे तुज, सांग घालतो जरा
आजवरी मी जिंकत गेलो, पुढे पुढेच गेलो
रागावुन का पाहतेस तू, आज हारतो जरा
मी राजा तू राणी माझी, भिती कशाची तुला?
साता जन्मांचे हे नाते, ऐक सांगतो जरा
दोन शरीरे, एक मनाने, फुलू, डुलू लागता
कसे स्वतः ला आवरायचे? पथ्य पाळतो जरा
कवेत घ्यावे रोज एकदा, असे वाटते मला
बंधन पडले मर्यादेचे, सभ्य वागतो जरा
कधी चहाडी, कधी मस्करी, कधी विनोदासवे
तुला चिडवतो खरे परंतू दूर राहतो जरा
हृदयाचा हा महाल 'शोभा' तू येता उजळला
मंजुळ गाणी सुचू लागली, सूर लावतो जरा
...................................................
शोभा तेलंग,
7724006713
No comments:
Post a Comment