तीन गझला : प्रज्ञा तगळपल्लेवार





१.


माझे माझे करता करता जीवन सरते

पैसा, वैभव सारे काही निष्फळ असते


किंमत मजला आयुष्याची कळली नाही

कळले अंती जाताना मग शून्यच उरते


अर्पण करते देहाला या चरणावरती

गळून जाता 'मी ' पण माझे सारे विरते


प्रत्येकाला जन्मोजन्मी कायम पुरते

चंदन होउन अपुली आई सदैव झिजते


वरवर हसणे जाणत नाही माझे दुनिया

नशिबाशी मी अविरत येथे झगडत बसते


ओझे होता डोक्यावरती त्या दुःखाचे 

सावरताना कळले कोणी अपुले नसते


दुःखाचे मग वाहत ओझे खांद्यावरती

आयुष्याला समजत गाणे मी गुणगुणते


२.


सोसत गेले कळ दुःखाची

किंमत कळली आयुष्याची


पालन केले मी नियमांचे

शिक्षा कुठल्या अपराधाची 


अक्षर अक्षर जोडत गेले

जादू कळली मग शब्दाची 


प्रेमाने जग जिंकत गेले 

इर्षा नाही मग कोणाची 


बोलुन कोडे नाही सुटले 

भाषा कळली मग मौनाची 


एकांताला तीव्र प्रतीक्षा 

आठवणीच्या सहवासाची 


तिळभर नाही भानावरती 

भक्ती करते भगवंताची 


३.


प्रेम हे अंतरीचे छळू लागले 

भाव मौनातले मग कळू लागले


मानले मी तुला देवता अंतरी

धूप होउन उगा मी जळू लागले


आस छळता तुझी लागतो ध्यास हा सावरू मी कसे मन चळू लागले


तू भ्रमर वेंधळा मी कळी कोवळी 

तू मला चुंबता... दरवळू लागले


पाहिले मी तुला दूर जाता क्षणी 

घाव ते आतले भळभळू लागले


दूर गेल्यावरी प्रेम कळले तुझे आतल्या आत मी तळमळू लागले


रोज सलतात काटे फुलांचे मला 

भाव शिशिरापरी मग गळू लागले

...................................................



2 comments:

  1. पहिल्या गझलेतील शेवटचा शेर आवडला.

    ReplyDelete
  2. छान सुंदर अप्रतिम रचना आहे

    ReplyDelete