१.
का असा पण पिंजऱ्यातच मुक्त वारा वाटतो
मोकळे आकाश म्हणजे कोंडमारा वाटतो
घ्याविशी त्यानेच जर का वाटते फाशी तुला
दोर मग म्हणते कशाला काचणारा वाटतो
काय नाही या इथे चोरीस जाण्यासारखे
कारणाविन चालला आहे पहारा वाटतो
निरनिराळ्या का भुकांना एक पंगत ठेवली
त्यात सगळ्यांचाच झाला पोटमारा वाटतो
एकटा माणूस सुद्धा राहिला माझा कुठे
ईश्वरा नावे तुझ्या हा सातबारा वाटतो
जे हवे ते सुख पसरले वाटते घऱ़भर जरी
एक तू नाहीस तर सारा पसारा वाटतो
वादळे आल्यास 'विद्या' धावते सोबत मला
जर कुठे गाठायला अवघड किनारा वाटतो
२.
एक पणती रोज जळते आत माझ्या
अन् प्रकाशत राहते आत्म्यात माझ्या
आठवांना सांग झोपू द्यायलाही
यायचे असल्यास जर स्वप्नात माझ्या
राग कोणाचा कधीही येत नाही
एवढी असते सतत प्रेमात माझ्या
ध्वस्त होऊ देत मी नाही किनारा
शांत इतकी वाहते पात्रात माझ्या
चांदण्या असुनी जवळ भुलणार नाही
फक्त मी दिसते मला चंद्रात माझ्या
पण तुला विसरायला आधी हवेना
मग पुन्हा येशील तू स्मरणात माझ्या
जायची निसटून ती नाही कधीही
ठेवली 'विद्या' अशी ताब्यात माझ्या
३.
दिवस वाटतो अता कुठे सण...तू गेल्याने
श्रावण सुद्धा करतो भणभण ...तू गेल्याने
नटते सजते मला हसवते कितीकवेळा
त्यात कधी 'मी 'असते का पण...तू गेल्याने
आत्मा केवळ सती कशाला जात असावा
देहाची जर होते वणवण ...तू गेल्याने
अजून कुंकू गडद जाहले मनात माझ्या
का पाडू मग उघडे गोंदण ...तू गेल्याने
दु:खांचे तर लाड जराही झाले नव्हते
निमुट साहिले कातरही क्षण...तू गेल्याने
ना नियतीने घाव घातला होता साधा
ना दुनियेने बुजू दिला व्रण ...तू गेल्याने
'विद्ये'ला तर किंमत काही उरली नाही
अन् लक्ष्मीने पेटवले रण... तू गेल्याने
....................................................

अंतर्मनातील बोल शब्दात मांडणे खूप कठीण काम असतं पण तुम्ही ते सहजरीत्या करतात. खूप छान👌👌
ReplyDeleteThank you
Deleteप्रत्येक गझल असो की कविता विद्या वाचताना किती दुःख बोलके होते.. पण वाचनारा निशब्द होतो...
ReplyDeleteThank you
ReplyDelete