दोन गझला : श्यामनाथ पारसकर

 




१.


आपल्या गल्लीत शिरला चोर भाऊ

झोपला तू केवढा बिनघोर भाऊ?


चोरट्यांचा भेव तेथे रात्र होते

जीव घेती ओळखीचे चोर भाऊ.


कोण तो शेजारचा डोळे वटारी

सोसशी तू केवढा कमजोर भाऊ?


फोडले थोबाड त्याचे चार वेळा

लागले नाही म्हणे शिरजोर भाऊ


मी तुम्हाला बोललो माझे मला द्या

केवढा अपराध माझा घोर भाऊ?

 

ते तसे सारे करुन नामानिराळे

तूच दिसला एक शंकेखोर भाऊ


कंपनी, पॅकेजसाठी ठाणबंदी

मानली तुमची गुलामी थोर भाऊ


अन्नदाता खंगला,अन्नान्न झाला

खायला ना भाकरीचे कोर भाऊ


आमच्या हातात शक्ती, प्रेरणा द्या 

फार झाले बांगडी-बिल्लोर भाऊ


घोटला माझा गळा उदरामधे का?

जाब मागे माउलीला पोर भाऊ

     

२.


बापू तुझे अहिंसक हत्त्यार तेज आहे 

हल्ली उपोषणाला भलतीच क्रेज आहे


नेता करी उपोषण, मंत्री करी उपोषण 

हर एक कार्यकर्ता चापून व्हेज आहे


सेवक करी उपोषण,याचक करी उपोषण 

बघती कुणास ज्यादा मिडिया फुटेज आहे


एखाद बाहुले घ्या,बसवा उपोषणाला

करण्या गरम हवेला तैयार स्टेज आहे


मैदान मारण्याला बसला जरी उपोषक

नेता मनात जाणे कुठले लगेज आहे


हल्ली उपोषणाला कारण हवे कुणाला

रुजवायची जनी ह्या अपुली इमेज आहे

...................................................


               

No comments:

Post a Comment