दोन गझला : रोशनकुमार शामजी पिलेवान

 




१.

केवढा अन्याय होतो  बापरे
दुश्मनांना ही भरावे कापरे

मांडतो बाजार लेकींचा इथे
बाप नाही तो असावा साप रे

योजनांचा सारखा पाऊस की
निवडणूकीची असावी थाप रे

हे कुपोषित रान टाहो फोडते
आळवीते भूक हा आलाप रे

पाहताना भोवती आकांत हा
आवरावा मी कसा संताप रे

चालली सर्रास ही  बेबंदशाही
भोगतो आम्ही व्यथा का  बारमाही

ही निवडणुक संपली की रक्त पीते
तर्जनीवर, संपणारी लोकशाही

हिंडलो साक्षात शोधाया खुदाला
गावलो नाही कधी माझा मलाही

का असा हल्ली पिसाटासारखा मी
शोधतो आहे तुला वाटात  दाही

चार दिवसांचाच आहे सोबती मी
घे अता भोगून मी दिसणार नाही

.................................
रोशनकुमार शामजी पिलेवान
मु.पो.ता.खानापूर ,
जि.सांगली,
पिन ४१५३०७
7798509816

No comments:

Post a Comment