तीन गझला : प्रकाश क्षीरसागर




१.


माणसा रे माणसाशी जोड नाते

वैरभावाशी तुझे ते तोड नाते


कोणतीही बाग मग सुकणार नाही

जोडते जेथे मुळाशी खोड नाते


पाहते कोणी तुला चोरून येथे

पाहता डोळ्यांत कोणा गोड नाते


पावसाची ओढ लागे पेरल्यावर

का म्हणावे अंकुराला मोड नाते


अंतरीचे बंध 'सागर' घट्ट असता

सांगती का लोक तेव्हा तोड नाते


२.


पेरले मी जोंधळे रानात माझ्या

एकही दाणा नुरे हातात माझ्या


कोरडे आभाळ फिरते वांझ कुठले

थेंबही पाऊस ना गावात माझ्या


रान माझे चोपणाचे पीक जळते

बांध लावी भांडणे भावात माझ्या


सातबारा कोरड्या विहिरीत रडतो

कोठलेही पीक ना  माळात माझ्या


शेतमाला भाव नसतो कर्ज वाढे

लावतो गळफास तो देहात माझ्या


हरवले आहे बियाणे पेव फुटले

पूर्वजांना शोधतो नातात माझ्या


बैल गेले, संपले कसणेच वावर

हंबरे... 'सागर', गाय गोठ्यात माझ्या


३.


वादळी चर्चा तयांची फोल आहे

अन् विकासाचा फुकाचा ढोल आहे


कालचे रस्ते इथे बेकाम झाले

वाहनांच्या वर्दळीला 'टोल' आहे


भावना चुरगाळल्या जरी तू

प्रेम माझे  अंतरी अनमोल आहे


भुलवतो भुंगा फुलांना गुणगुणोनी

छेडणारा प्रिय तयाचा बोल आहे


बेगडी प्रेमात होतो गुंग 'सागर'

भुलभुलैया जगाचा गोल आहे


..................................................

No comments:

Post a Comment