१.
भरतात घाव दुखरे तू हासतेस तेव्हा
सुचतात गोड मिसरे तू हासतेस तेव्हा
विसरून भान खिळती नजरा तुझ्याचवरती
हृदयात कोण दुसरे? तू हासतेस तेव्हा?
वाटत कुणी जवळचे नाही तुझ्याप्रमाणे
म्हणतो जगास उपरे ; तू हासतेस तेव्हा
असलीस शांत तू की जाते रया फुलांची
गंधाळतात गजरे तू हासतेस तेव्हा
असतात शांत निश्चल उनपावसामधे पण
वेडावतात शिखरे, तू हासतेस तेव्हा
मी आवरू कसे या वेड्यापिशा मनाला?
लाखो मनात नखरे..तू हासतेस तेव्हा
जग-बीग सोड नसते मजला खबर स्वतःची
दोघांत कोण तिसरे?तू हासतेस तेव्हा
झुरतात रोज गावे विरहामधे तुझ्या अन्
हसतात रोज शहरे,तू हासतेस तेव्हा
अवघ्या चराचराला प्रेमात पाडणाऱ्या
चंद्रात भाव हसरे,तू हासतेस तेव्हा
२.
कधीची मजल दरमजल चालली
दिशेने कुण्या ही गझल चालली?
कधीही न सुटणार ठाऊक पण
तरी जीवनाची उकल चालली
तुला ठेवले शेत राखायला
तुझी कुंपणावर मजल चालली
भरवसा न वाचायचा राहिला
किती जिंदगानी सखल चालली
जिवापाड निष्ठेस जपते कुणी
कुणाची सतत दलबदल चालली
व्यथा, वेदना पावलोपावली
कुठे जीवनाची सहल चालली?
कदरदान दुसरा मिळाला कुणी
मला सोडुनी एक सल चालली
असे काय आहे हरवले तुझे?
मनाची किती चलबिचल चालली
जिव्हाळा तुला माणसांचा म्हणुन
तुझी जिंदगी बेदखल चालली
तरन्नुमपुढे खानदानी तुझ्या
गझल चालली ना हझल चालली
तुझ्यावाचुनी एकटा चंद्रमा
उभी जिंदगानी धवल चालली!
३.
दिवाळी कधीतरी ; सारखी होळी येते
रोजरोज काखेत आमच्या झोळी येते
ओरबाडता तुम्हीच माझे सारे काही
ताटामध्ये तुमच्याच पुरणपोळी येते
कास कधीही सोडत नाही जो सत्याची
वाट्याला त्याच्याच राखरांगोळी येते
रेंगाळत असतो ओठांवर शेर सारखा
ओठांवरती कधीतरी चारोळी येते
जबाबदारीची जाणिव होते बापाला
लेकीला जेंव्हा मायीची चोळी येते
आजोबा, आजीला कायम शोधत बसते
जेंव्हा जेंव्हा नात तिच्या आजोळी येते
आईचा हुंदका अचानक झोप उडवतो
स्वप्नामध्ये बापाची आरोळी येते
तरल अलवार जेंव्हा जेंव्हा स्फुरते काही
तुझीच प्रतिमा मनात साधीभोळी येते
फ्लॅट, बंगला, जमीनजुमला काही नाही
शेवटास केवळ जागा चिंचोळी येते
असे तिच्या पाशात अडकले आहे कोणी
कोळ्याच्या जाळ्यात जशी मासोळी येते
रात्ररात्रभर चंद्र एकटा जागत नाही
जागवायला नक्षत्रांची टोळी येते
.................................
चंद्रकांत कदम (सन्मित्र)
नांदेड
992178961
No comments:
Post a Comment