तीन गझला : जयवंत वानखडे

 





१.

बस एवढेच देवा दानात पाहिजे
जोडून हात लक्ष्मी दारात पाहिजे

गावास स्वर्ग मानू राहू इथेच पण
हातास काम माझ्या गावात पाहिजे

होतोय मंद अग्नी पोटातला तरी
भाकर कधीतरी पण ताटात पाहिजे

सगळेच लेकराला देऊ नकोस तू
पैसा उद्यास अपुल्या हातात पाहिजे

दु:खास डांबणेही नाही कठीण पण
अतिरिक्त एक कप्पा हृदयात पाहिजे

२.

हवी संधी दुरावा सांधण्यासाठी
तिला भेटायचे आहे अशासाठी

तुला लपवू सुखा कोठे कळत नाही
व्यथा आली अचानक भेटण्यासाठी

नको थांबूस चढ पाहून वाटेवर
तयारी कर मनाची धावण्यासाठी

जराशी वाटते चिंता भविष्याची
तसा आहे सुखी मी सांगण्यासाठी

किती तंबूत नाचावे कुणी सांगा
इथे कीर्ती अबाधित ठेवण्यासाठी

३.

रडत असलो जरी सध्या, उद्या हसणार आहे मी
सुखाला शोधणारा खास किमयागार आहे मी

कधी परके, कधी अपुले  मला हरवायला आले
असे का वाटले त्यांना सहज हरणार आहे मी

कुणा बेडर, कुणा हट्टी, कुणाला वाटतो तिरकस
जसा आहे तसा त्यांना कधी कळणार आहे मी

म्हणे बाबा तुझ्या शहरी कुणी बोलायला नाही
जुना शेजार सुटल्यावर कसा जगणार आहे मी

कमी झालेत येणारे मला भेटायला आता
जुने वैभव हरवलेला वडाचा पार आहे मी


....................................................
जयवंत वानखडे,
कोरपना
जि. चंद्रपूर
मो.९८२३६४५६५५

No comments:

Post a Comment