तीन गझला : संजय गोरडे 'सौभद्र'

 




१.


तुझ्या रस्त्यात धगधगते निखारे, काळजी घे

शिरू देऊ नको नाकात वारे, काळजी घे 


इथे सारेच मैलाचे दगड आहेत नुसते 

कुणी नाहीच रस्ता सांगणारे, काळजी घे


जगाचा नेमका चेहरा कळावा याचसाठी 

तुला मी नेहमी केले इशारे, काळजी घे


इथे नाहीच काहीही कुणाच्या मालकीचे 

इथे आपापले आपण पसारे, काळजी घे 


किनारा शोधण्यातच जन्मही गेला कुणाचा 

कुणी गोंजारले केवळ किनारे, काळजी घे


सुरू आहे इथे सर्वत्र स्पर्धा धावण्याची

इथे जिंकून आले थांबणारे! काळजी घे 


२.


एकदा नाहीच, वारंवार शिकवू पाहतो

का मला प्रत्येकजण व्यवहार शिकवू पाहतो? 


कोणता रस्ता प्रकाशाच्या दिशेने चालला? 

हे मला इथला गडद अंधार शिकवू पाहतो !


वाट चुकलेलाच वाटाड्या हवा आहे मला 

जिंकणारा तर मला माघार शिकवू पाहतो


स्वागताला 'सावधानीचा इशारा' गेटवर 

बंगला शहरात पाहुणचार शिकवू पाहतो  


कैकदा फसलो तरीही ठेवतो विश्वास मी 

मी मला दररोज शिष्टाचार शिकवू पाहतो


३.


वरतून सभ्यतेचा केवळ बनाव आहे 

रक्तात माणसांच्या पण भेदभाव आहे 


नक्कीच राजकारण जादू असेल काळी 

प्रत्येक माणसावर त्याचा प्रभाव आहे 


चिरडून माणसांना गेले निघून रस्ते 

थिजले कलेवरांच्या डोळ्यांत गाव आहे. 


मी ठेवलीत माझी स्वप्ने गहाण आता

पोटातल्या भुकेची सुरु कावकाव आहे 


सौभद्र क्षुद्र आहे माझा विचार सुद्धा

मी फक्त आपल्यांचा केला बचाव आहे


...................................................


1 comment:

  1. अप्रतिम.... तीनही गझला जबरदस्त आहेत

    ReplyDelete