तीन गझला : प्रशांत भंडारे

 




१.


असेल वाचत कविता अथवा गात असावी

फोन उचलला नाही ती कामात असावी


जुनी डायरी, मोरपंख अन् एक बाहुली

लग्नानंतर उगाच का स्मरणात असावी


बाग फुलवली असेल दारी तिने फुलांची

एक गुलाबी कळी तिच्या केसात असावी


गर्भ रात्रिचा वाट्याला ती देउन मजला

गोड सकाळी उन्हात अजुनी न्हात असावी


रोज चेहरा बघताना दिसतो का कोणी

आरशातली जादू की प्रेमात असावी


सुखात असुनी उदास दिसते कमाल आहे

एक अनामिक हुरहुर बहुधा खात असावी


हृदय थांबले असून सुद्धा जिवंत आहे

अधेमधे गतकाळामध्ये जात असावी


२.


डोळ्यांमध्ये अश्रू आणिक हातामध्ये घास  होता

पोट भुकेले होते तेंव्हा गहिवरलेला श्वास होता


फेकत दिसले ताट कुणी अन् कुणी शोधतो उकिरड्यावर

अजीर्ण झाले काहींना अन् कुठे भुकेचा त्रास होता


कमीज, कुर्ता, जीन्स पॅन्ट या साऱ्यांमध्ये रोज दिसते

तिला बघितले साडीमध्ये कळले सण हमखास होता


डोक्यावरती पाटी घेउन गावोगावी बाप फिरला

वाट विसरला नाही सोबत भाकरीचा सुवास होता


तिची मोहिनी पडली जेंव्हा गटागटा तो पीत गेला

अंथरुणावर खिळल्यानंतर कळले तो गळफास होता 


३.


रणरणत्या सूर्याला सुद्धा पाणी देतो

दुःखाच्या ओठांवर हसरी गाणी देतो


सोप्पे नसते एकाकीपण कळले जेंव्हा 

पत्त्यामधल्या राजालाही राणी देतो


लाथ मारुनी उडवत  जातो जो न्यायाला

पुढे त्यास जग प्रवास मग अनवाणी देतो


लोक बोलले बरेच झाले वेडा मेला 

मरणारा पण जगणाऱ्यास कहाणी देतो


हिणवत असती लोक शहाणे भोळ्यालाही

मग भोळ्याला पत्नी देव शहाणी देतो


खुशाल बोला मला हवे तर भ्रष्टाचारी

पुण्यांसाठी भुकेल्यास मी नाणी देतो


एकदातरी कलिंग व्हावे मनात माझ्या

युद्धानंतर व्यक्ती सम्यक वाणी देतो

...................................................

No comments:

Post a Comment