१.
कळले कधी नाही, मनोव्यापार आयुष्या तुझे
काढायचे कोणी कसे, मग सार आयुष्या तुझे?
लाखो करोडोंचे गणित, चुटकीत सोडवतोस तू
चुकले कसे प्रेमामधे, व्यवहार आयुष्या तुझे?
भासांत जगतो, जागतो अन् मोजतो तारे अता
केव्हा, कसे जडले मला, आजार आयुष्या तुझे?
अध्याय माझे यापुढे, लिहिणार आहे मी स्वतः
उपदेश आता फार झाले, फार आयुष्या तुझे
निष्पर्ण फांद्या, माळही, काटे, गुलाबी ओलही
प्रत्येक जपले पान मी, हळुवार आयुष्या तुझे
गाठायचे आहे क्षितिज, अद्याप गझलेचे मला
तोवर कसे मानू गड्या, आभार आयुष्या तुझे?
२.
कालपरिघाच्याच मर्यादेमधे फिरतात इच्छा
माणसांचा जन्म सरतो, पण अमर असतात इच्छा
हिंस्र प्राण्यांसारखे जर आपले काहीच नाही
का बरे मग आपल्याही, पाशवी बनतात इच्छा?
जे कुणालाही दिवसभर, सांगता नाहीच आले
रात्रभर सारे उशीसंगेच बडबडतात इच्छा
आपल्यामधलेच अंतर फार समजुतदार आहे
एकमेकांना समांतर नेहमी जळतात इच्छा
तू मला दिसतेस पण...मग काय बोलू... प्रश्न पडतो?
अंतरी कल्लोळ नुसता... आणखी छळतात इच्छा
कोणतीशी गूढ विद्याही, तिला ठाऊक आहे
सांगण्याआधी म्हणूनच, आइला कळतात इच्छा
वासनेच्या तुच्छ गरजेतून, त्यांचे प्रेम होते
आणि मग रस्त्यालगत, कचर्यामधे रडतात इच्छा
३.
मदिरेमधे स्वतःला, बुडवायचे किती
आयुष्य राहिलेले, उधळायचे किती
नाहीस तू इथे अन् नाहीस तू तिथे
मी जीवनात रस्ते, बदलायचे किती
येणार तू म्हणूनी, ही रात्र जागतो
तू सांग या मनाला , फसवायचे किती
माझ्याच अंतरी तू, होऊन कस्तुरी
शोधीत गंध तो मी , भटकायचे किती
उमगेल का कुणाला, सांगून ही व्यथा
हे पाट आसवांचे, अडवायचे किती
केलेस काळजावर, सुकुमार वार जे
दिसणार ते जगाला, लपवायचे किती
झाली सणांप्रमाणे, दुःखे अता मला
या दोन पापण्यांना, भिजवायचे किती
कवितेत तूच माझ्या, आरोप हा प्रिये
त्यातूनही तुला मी, वगळायचे किती
....................................................

छानच गझल...सातत्याने लिहीत रहा...भविष्यासाठी शुभेच्छा!
ReplyDelete