तीन गझला : सौ. अंजली आ. मराठे

  




१.


प्रवासात जग पालथे घातले 

मला शेवटी घर दिसू लागले


मुळे घट्ट पकडून मी ठेवली

सहज उंच आभाळ मी गाठले


जुने रंग आणिक जुने कुंचले

सुखाचे नवे चित्र मी काढले


नशा होत गेली सुरांची तुझ्या

भरीला नजर मी तुझी प्यायले


ठरवले चुका मी सुधारायच्या

पुन्हा जन्म घ्यावा असे वाटले


२.


इतरांवरती चिखल फेकणे कुठे थांबले? 

चिखलामध्ये कमळ उगवणे कुठे थांबले? 


लाख मणाच्या बेड्या होत्या पायांमध्ये

स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणे कुठे थांबले? 


निकोप स्पर्धा करण्याचे बळ कुणात आहे? 

विजयासाठी पाय खेचणे कुठे थांबले?


देहाइतकी जमीन पुरते मेल्यानंतर

लाखो एकर तरी हडपणे कुठे थांबले?


चढुन पायरी शिखर गाठणे सोपे असते

पायरीस त्या सहज विसरणे कुठे थांबले?


पानगळीचे येणे निश्चित बहरानंतर

पण वृक्षांचे पुन्हा बहरणे  कुठे थांबले?


मोक्ष मिळावा म्हणून त्याने देह बदलले 

आत्म्याचे अव्याहत फिरणे कुठे थांबले?



३.


भाव नेमका मनातला कधी कळेल का?

चेहऱ्यापलीकडील चेहरा दिसेल का?


लोभ, मोह, क्रोध, शोक भोग प्राक्तनातले

ठेवुनी अलिप्त सर्व मोक्ष सापडेल का?


ताठ मान ठेवली सदैव शत्रुच्या पुढे

आपल्यांसमोर आज वाकणे जमेल का?


जीवनात कर्मभोग सोसलाच पाहिजे 

दृष्ट काढली तरी इडा, पिडा टळेल का?


चालतात सर्व रोजचीच वाट ही जरी

वेगळी दिशा कुणासही कधी मिळेल का?


....................................................

साै.अंजली आशुतोष मराठे, बडोदे, गुजरात

2 comments:

  1. वाह...अंजली,तिन्ही गझला सुंदर.
    दुसरी गझल विशेष भावली..

    ReplyDelete
  2. धन्यवाद सुषमा ❤🙏

    ReplyDelete