तीन गझला : शांताराम हिवराळे

 




१.

चपळ मनाला बांध घालणे इतके सोपे नसते
आयुष्याचे शिखर गाठणे इतके सोपे नसते

फसवतोस का दुनियेला तू दिवसा ढवळ्या मित्रा
कबूल करणे, सत्य बोलणे इतके सोपे नसते

उगाच ताठा अहंकार हा फुकाच आहे येथे
दुसर्‍यासाठी झिजत राहणे इतके सोपे नसते

रस्त्यामध्ये खड्डे आणिक खड्ड्यामध्ये पाणी
पाण्यामधला मार्ग टाळणे इतके सोपे नसते

खंत कुणाला नाही येथे कितीक आले गेले
विकास झाला असे सांगणे इतके सोपे नसते

मिळकत नाही दमडीची पण रुबाब मोठा आहे
संसाराला वळण लावणे इतके सोपे नसते

धुमसत आहे आग अशी की शब्द पेटले सारे
वणव्याला बघ कधी रोखणे इतके सोपे नसते

२.

रंग बदलती सरड्यावाणी इथे माणसे
वागतात का तुटल्यावाणी इथे माणसे?

शांत जरी हा वाटत असला ढोंगी बगळा
भासतात का बगळ्यावाणी इथे माणसे?

रस्त्याला बघ फुटती येथे अनेक रस्ते
वाटतात का चुकल्यावाणी इथे माणसे?

खडकासमान इथले जगणे झाले आता
राहतात का दबल्यावाणी इथे माणसे?

जो तो आता पैशामागे धावत सुटतो
का दिसती मग सुकल्यावाणी इथे माणसे?

प्रश्न असे की असंख्य येथे गिणती नाही
उत्तरास बघ बुजल्यावाणी इथे माणसे?

माणसास का माणूस असा  परका झाला?
समानतेला मुकल्यावाणी इथे माणसे

३.

लाट येते,लाट फुटते, सागराला काय त्याचे
माणसे घायाळ झाली, वादळाला काय त्याचे

भाकरीला पीठ नाही कोणती ही रीत सांगा
प्रश्न मोठा जीवघेणा, शासनाला काय त्याचे

रोज येथे पाहतो मी कष्टणारे हात खाली
भ्रष्टतेने मातलेल्या माणसाला काय त्याचे

भावनांची साठमारी चालते बघ रोज येथे
रोज येथे खून होतो, घातक्याला काय त्याचे

झोपड्या वाहून गेल्या वेदनेला अंत नाही
पोरका माणूस झाला, पावसाला काय त्याचे

स्वप्नवेडे पाखरू पण सांजवेळी दूर गेले
झाड बघ वाळून गेले, पाखराला काय त्याचे

माणसांना जोडणारी काळजाची ओल नाही
शब्दही का मूक झाले,
या जगाला काय त्याचे

.................................
शांताराम हिवराळे,
पिंपरी,पुणे
9922937339

5 comments:

  1. खुप सुंदर तीनही गझला

    ReplyDelete
  2. खुप छान सर👌👌💐💐❤️❤️

    ReplyDelete
  3. सुंदर गझला सर🙏

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर सर आपल्या तिन्ही गझला

    ReplyDelete
  5. वास्तव चित्र दर्शविले आहे. छान.

    ReplyDelete